उरणमध्ये संरक्षण भिंत घरावर कोसळून आई मुलांसह तीनजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:05 PM2022-09-13T15:05:23+5:302022-09-13T15:05:59+5:30
करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मधुकर ठाकूर
उरण :
करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. संगिता पाटील (४५), कुणाल पाटील, (२२) दिपेश पाटील (२०) अशी जखमींची नावे असुन त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी सातघर गाव वसलेले आहे. डोंगराच्या उतारावर दाटीवाटीने वसलेल्या सातघरात
महेंद्र पाटील यांचे कुटुंबीय राहात आहेत.पाटील यांच्या घराच्या समोरच उंचावर केशव गावंड यांच्या घराची संरक्षक भिंत आहे.मंगळवारी (१३) पहाटे तीन वाजताच्या सुमारास अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत पाटील यांच्या घरावरच कोसळली.सरक्षंक भिंतींचा वीटा, सिमेंट कॉक्रीटचा मलबा साखर झोपेत असलेल्या व घरात झोपलेल्या संगिता पाटील, कुणाल पाटील, दिपेश पाटील यांच्यावर पडला.
मलब्याखाली दबल्याने आई- मुलांसह तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत.वैभव पाटील हा दुसऱ्या खोलीत झोपलेला असल्याने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. आरडाओरडा झाल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मलब्याखालुन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ॲम्ब्युलन्समधुन नवी मुंबईतील डी.वाय पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.संगीता यांना शरीरातील ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्रॅक्चर आणि गंभीर दुखापत झाल्याने तातडीने दोन तर कुणाल यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने एक शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.शस्त्रक्रियेसाठी दोघांनाही एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उरण तहसीलदार कार्यालयातुन देण्यात आली.