- आविष्कार देसाई रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत असलेल्या फार्महाउसमध्ये बळजबरीने घुसून तेथील सुरक्षारक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की करणाऱ्या तिघा जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनुज कुमार, यशपाल सिंग, प्रदीप धनावडे अशी आरोपींची नावे असून पैकी दोन आरोपी हे एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार असल्याचे बोलले जाते, त्यांच्याकडे ओळखपत्रे सापडली आहेत. संबंधित वृत्तवाहिनी व्यवस्थापनाकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. काहीच दिवसांपूर्वी मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क असून ठाकरे फार्महाउसवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
भिलवले (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फार्महाउस आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता टुरिस्ट कारमधून आलेले तीन जण ‘ठाकरे फार्महाउस’बाबत विचारपूस करीत होते. गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने ‘आपल्याला माहीत नाही’ असे उत्तर त्याने दिले.
काही वेळाने त्या तिघांनी फार्महाउसमध्ये प्रवेश करून त्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली आणि तेथून ते फरार झाले. सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवत याबाबतची माहिती आणि गाडी क्रमांक पोलिसांना कळवला. त्यानंतर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करून ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतून त्यांना ताब्यात घेतले. खालापूर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबरला सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.