दासगाव : ग्रामीण भागात रस्त्यांची सुविधा मिळण्यासाठी पंतप्रधान सडक योजना राबविली जाते. मात्र या योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांचा देखभाल दुरूस्तीचा कालावधी संपताच हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे ही योजना दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी राबविली जाते की ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. महाड तालुक्यातील रावढळ ते अंबिवली असा सुमारे ९.३८ किमीचा रस्ता २००९ मध्ये तयार करण्यात आला. एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ठाणे यांनी हा रस्ता बनविला. या रस्त्यावर २६५.१७ लक्ष रूपये खर्ची टाकण्यात आला. पंतप्रधान सडक योजनेतील नियमाप्रमाणे रस्ता पूर्ण झाल्यापासूनची पाच वर्षे त्या रस्त्याची देखभाल संबंधित ठेकेदाराने करावयाची असते. रस्ता सुस्थितीत राहील यासाठी हा नियम देण्यात आला असून अधिकारी आणि ठेकेदारांनी केवळ देखभाल दुरूस्ती कालावधीतच रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे लक्ष्य समोर ठेवून रस्ते तयार केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रावढळ ते अंबिवली हा रस्ता खाडी पट्ट्यातून पोलादपूर, खेड, दापोलीकडे जोडणारा जवळचा रस्ता आहे. मोठी वाहने नाहीत मात्र छोट्या वाहनांची वर्दळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आहे. वामणे सापे रेल्वे स्थानक याच रस्त्यावर असल्याने परिसरातील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. पंंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट होण्याआधी या रस्त्यावरून जाण्यास चालक धजावत नसे. २००९ मध्ये पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत हा रस्ता चांगला झाल्याने रस्त्यावर वर्दळ वाढली होती. मात्र गतवर्षी रस्त्याचा देखभाल दुरूस्ती कालावधी संपल्याने पुन्हा रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे. अंबिवली ते रावढळ अशा संपूर्ण रस्त्यावरील वळणांवर खड्डे पडून दगड बाहेर आले आहेत. बारीक खडी सर्वत्र विखुरल्याने रस्ता निसडा झाला आहे. रस्त्यावरील काँक्रीटच्या पोलचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून जर रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था होत असेल तर शासनामार्फत येणारा निधी ग्रामस्थांसाठी की ठेकेदारांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पंतप्रधान सडक योजनेचा देखभाल कालावधी ५ वर्षे आहे. रावढळ-अंबिवली रस्त्याची पाहणी केली आहे. रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून मोठ्या प्रमाणात या रस्त्याला खड्डे पडले आहेत. लवकरच या रस्त्याचे खड्डे भरले जातील.- पी.राऊत, उपअभियंता, पंतप्रधान सडक योजना, माणगाव कार्यालय.
महाडमध्ये सडक योजनेचे तीनतेरा
By admin | Published: January 29, 2017 2:24 AM