मधुकर ठाकूर -उरण : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पोलिस चौक्या तर करंजा येथील बंदरात चौकीसह वॉच टॉवर उभारण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
उरण परिसरातील ठिकठिकाणी चौपदरी, सहापदरी रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.त्यामुळे उरणची भौगोलिक परिस्थिती बदलली आहे.यामुळे याआधी सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेल्या बोकडवीरा, ओएनजीसी-नागाव आणि परिसरात इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या जुन्या पोलिस चौक्या आता कुचकामी ठरु लागल्या आहेत.त्यामुळे गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी आता कुचकामी ठरु लागलेल्या पोलिस चौक्या हलवून परिसरातील मोक्याच्या ठिकाणी बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
उरण शहरात येजा करण्यासाठी आता अनेक रस्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.यामुळे बोकडवीरा गावाजवळ असलेली जुनी पोलिस चौकी हटवुन खोपटा ब्रीज व करंजा कोस्टल रोडशी जोडले गेलेल्या चौकात पोलिस चौकी बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.करंजा बंदर परिसरात रो-रो सेवा, करंजा मच्छीमार बंदर व करंजा लॉजिस्टिक्स टर्मिनलमुळे व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे.भविष्यातही व्यापार,व्यवसायासाठी करंजा परिसरात गर्दी वाढतच जाणार आहे.त्यामुळे विविध प्रकारच्या गुन्हेगारीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी करंजा येथे पोलिस चौकीबरोबरच उंचीचे वॉचटॉवर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तसेच उरण परिसरातील मोक्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार तीन पोलिस चौक्या उभारण्यात येणार आहेत.तशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.तसेच उरण परिसरातील ग्रामपंचायतींनाही आपापल्या हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना दिल्या आहेत.सुचनेनंतर १५-२० ग्रामपंचायतींनी हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचेही निकम यांनी सांगितले.