लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर पोलीस ठाण्यात मे महिन्यात सेक्टर २० मध्ये वास्तू विश्व या सोसायटीत राहणाऱ्या मेघजी गेला घोटी यांच्या घरात मोठा दरोडा पडला होता. घोटी यांच्या घरातील १८ तोळे सोने व चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. २७ मे रोजी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत तपास लावून खारघर पोलिसांनी तीन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करीत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. घरफोडी प्रकरणी दिलबर हुसेन लालचंद शेख (२२), मुसफ्फर लालचंद शेख (२१), महम्मद बाबर अली जमशेद खान (४४) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी मिस्त्री काम करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मेघजी घोटी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी विविध कामे सुरू होती. त्यामध्ये घराचे नूतनीकरण करताना तीनही आरोपींनी भिंतीवर टाईल्स लावण्याचे काम केले होते. घरफोडीनंतर तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. घागरे यांनी तिघांचा शोध घेतला असता ते खारघरमध्ये नसल्याचे उघड झाले. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी अधिक तपास केला असता हे आरोपी पश्चिम बंगालमधील माल्दा याठिकाणी असल्याचे समजले. आरोपींचा शोध घेण्यासाठी खारघर पोलीस ठाण्यातून तीन जणांचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. घागरे, पोलीस अंमलदार प्रमोद वाघ, पोलीस शिपाई वाठोरे यांचा समावेश होता. याठिकाणी पोहचल्यानंतर तीनही आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. घागरे यांनी दिली.
घरफोडी करणाऱ्या तिघांना पश्चिम बंगालमधून अटक
By admin | Published: June 17, 2017 2:02 AM