कार्ले आदिवासी वाडीमधून तीन चंदन विक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:32 AM2019-12-24T02:32:38+5:302019-12-24T02:33:00+5:30
लाखोंचे चंदन हस्तगत : दिघी सागरी पोलिसांची कारवाई
बोर्ली पंचतन : बोर्ली पंचतनजवळ असलेल्या कार्ले आदिवासी वाडीमध्ये चंदनाची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ किलो चंदन हस्तगत करण्यात आले आहे. त्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपींनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेले सुमारे २ लाखांचे ६० किलो चंदन पोलिसांनी हस्तगत केले. अजूनही चंदन हस्तगत करण्याचे काम सुरू असून हा आकडा १५० किलोपर्यंत जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावातील अस्लम गुलाम ढांगू (४५) हे दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोर्ली पंचतनजवळील कार्ले आदिवासी वाडीतील गोरख रघुनाथ खोपकर व उमेश रामू पवार यांच्याकडून चंदन घेण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कार्ले आदिवासी मार्गावर तिघांनाही चंदन विक्री करताना ताब्यात घेतले. यापैकी दोघे जंगलातून चंदन तोडून अस्लम ढांगू यांना विकायचे.
घटनास्थळावरून पोलिसांनी ९ हजारांचे चंदन व गाडी ताब्यात घेतली. अधिक चौकशीत ढांगू या आरोपीच्या श्रीवर्धन येथील एका ठिकाणाहून व लपविलेल्या अन्य ठिकाणाहून आतापर्यंत २ लाखांचे ६० किलो चंदन पोलिसांनी हस्तगत केले आहे. अजूनही चंदन हस्तगत करण्याचे काम सुरू असून अंदाजे ५ लाखांचे १५० किलो चंदन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.