अलिबाग : तालुक्यातील रेवस-बोडणी परिसरामध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गावातील सुमारे १५ जणांना या तापाने ग्रासले असल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर खासगी रुग्णालयामध्ये तपासणी केलेल्या सुमारे सात रुग्णांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावामध्ये औषध फवारणी केली आहे.गेले काही दिवस रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी दवाखान्यातच उपचारासाठी जातात. त्यामुळे रुग्णांचा आकडा मिळण्यात सरकारी यंत्रणेला अडचणीचे ठरत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकारी रुग्णालयामध्येही तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. अलिबाग तालुक्यातील रेवस-बोडणी परिसरामध्ये गेल्या १५ दिवसांपासून तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. काही महिन्यापूर्वी एका महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने तिला सुरुवातीला सरकारी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या रक्ताची तपासणी केल्यानंतर तिला अधिक उपचारासाठी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेला डेंग्यू झाल्याचे पुढे निष्पन्न झाले होते. नंतर ती महिला उपचारानंतर बरी झाली होती.सध्या गावातील सुमारे १५ जणांना डेंग्यूसदृश ताप येत असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. सर्वजण उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घेत आहेत. तेथे केलेल्या रक्ताच्या तपासणीमध्ये सुमारे सात जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे समोर आल्याचे रेवस-बोडणी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अंबर नाखवा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गावातील अन्य १५ जण तापाने फणफणले आहेत. त्यांनाही ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून आली होती. त्यांनीही खासगी रुग्णालयाचा आधार घेतलेला आहे. या साथीच्या तापाचा प्रसार गावात होऊ नये यासाठी याची माहिती तातडीने आरोग्य विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पेढांबे येथील आरोग्य पथकाने गावात औषधाची फवारणी केली होती. अधिक खबरदारीचा उपाय म्हणून फॉगिंग मशीनचाही वापर करण्यात आल्याचे नाखवा यांनी स्पष्ट केले.>एका महिलेचा मृत्यूपेढांबे आरोग्य केंद्रामध्ये एक महिला उपचारासाठी आली होती, त्यानंतर तिने अलिबागच्या खासगी रुग्णालयात उपचार के ले. ंअधिक उपचारासाठी तिला मुंबई येथील जसलोक रु ग्णालयात दाखल केले होते. त्यामध्ये तिचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला ठाणे येथे नातेवाइकांकडे गेली होती, तेथे तिला डेंग्यूची लागण झाली असावी असे आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी स्पष्ट के ले.>आठ दिवसांपूर्वी रेवस-बोडणी परिसरामध्ये डेंग्यूसदृश तापाची साथ आली आहे, असे समजले होते. त्यानुसार तेथे तातडीने औषध फवारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील ताप आलेल्यांच्या रक्ताची तपासणी केली आहे. त्याबाबतचे अहवाल लवकरच प्राप्त होतील. तापाच्या रुग्णांनी आपल्या रक्ताची तपासणीही सरकारी रुग्णालयातच करून घ्यावी.- डॉ.सुधाकर मोरे,जिल्हा आरोग्य अधिकारी
रेवस-बोडणी परिसरामध्ये डेंग्यूचे १५ संशयित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:44 PM