तीन तालुक्यांत नुकसानीचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:16 AM2018-10-27T00:16:00+5:302018-10-27T00:16:02+5:30
यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने भात पिकांना फटका दिला.
- जयंत धुळप
अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने भात पिकांना फटका दिला. दुष्काळी गावांचे सत्यमापन (ग्राउंड ट्रूथ) करण्याच्या सूचना राज्याच्या कृषी विभागाला देण्यात आल्या असून राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि सुधागड या दोन तालुक्यांना तर शेजारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यास ‘गंभीर स्वरूपाच्या दुष्काळा’ची झळ बसली आहे. श्रीवर्धन तालुक्यास मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाची झळ बसली आहे.
शासनाच्या महाराष्ट्र सुदुर संवेदन यंत्रणेकडून (एमआरएसएसी) राज्याच्या कृषी आयुक्तालयास प्राप्त झालेल्या सप्टेंबर २०१८ अखेरच्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी झळ लागू झालेल्या तालुक्यांत राज्यातील ३२ जिल्ह्यातील ११२ तालुक्यांत गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाची झळ तर ६० तालुक्यांना मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाची झळ लागू झाली
आहे.
दुष्काळी परिस्थितीची पाहणीसाठी केंद्र सरकारची महालॅनोबीस नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग (एमएनसीएफ) ही संस्था कार्यरत आहे. पाहणी पथकास बोलावून रायगडमधील नुकसानीची पाहणी करून जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकºयांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष शिथिल केले असून, खरीप पेरणीत आॅगस्टअखेर सरासरीपेक्षा ३३.३३ टक्क्यांची घट झाल्यास दुष्काळ तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाल्यास गंभीर दुष्काळ असा असलेला निकष बदलून आता पेरणीत सरासरीच्या तुलनेत १५ टक्के घट झाली तर दुष्काळ आणि सरासरीच्या तुलनेत २५ टक्के पेक्षा घट झाल्यास गंभीर दुष्काळ असे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती.
कृषी आयुक्तालयाकडून आलेल्या आदेशांमुळे या मागणीत तथ्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रायगडमधील माणगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ३५ हजार खातेदार शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यापैकी सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रातील १२०० शेतकºयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची माहिती माणगाव तालुका कृषी अधिकारी पी.बी.नवले यांनी दिली आहे.
भातशेती पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून अद्याप सुरू असून, येत्या आठवडाभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमकी नुकसानी किती हे स्पष्ट होईल, असे नवले यांनी पुढे सांगितले.
>श्रीवर्धनमध्ये पिकांचे नुकसान
मध्यम स्वरूपाची दुष्काळ झळ लागून श्रीवर्धन तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रात भाताची तर १६८ हेक्टर क्षेत्रावर नाचणीची पेरणी करण्यात आली होती. या क्षेत्रातील एकूण खातेदार शेतकरी ६ हजार आहेत. एकूण पेरणी क्षेत्रापैकी २.६५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका आठ शेतकºयांना बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावांचे सत्यमापन करण्याच्या प्राप्त आदेशानुसार सुधागड तालुक्यात ८ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती श्रीवर्धन कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर यांनी दिली.