पेण : हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या ३००० एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने करून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. सध्या पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तब्बल १३०० एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या १७०० एकर क्षेत्रात भर पडून उन्हाळी हंगामातील भात लागवडीच्या क्षेत्राने एकूण ३००० एकराचा टप्पा गाठला आहे.
सध्या पिकांच्या अनुकूल वाढीसाठी उपयुक्त असे पोषक वातावरण आहे. पडलेला अवकाळी पाऊस, भरपूर पाणी, ऊन व खतांची मात्रा मिळाल्याने पिके बहरली असून या परिसरात सर्वत्र हिरवागार निसर्ग परिसर अनुभवता येतो आहे. रब्बीच्या हंगामात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने भाताला प्रति क्विंटलला दिलेला १८८०/-रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रति क्विंटलला बोनस मिळून २५८०/-रुपये मिळणारी आधारभूत किंमत, याशिवाय भाताच्या पेंढ्यांची एक गुंडी ६ ते ८ रुपयांस गुरांच्या वैरणीसाठी दुग्ध व्यावसायिक खरेदी करत असल्याने या पेंढ्यातून एकरी खर्च केलेला उत्पादन खर्च निघत असल्याने उन्हाळ्यात भातशेती लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. याशिवाय गत वर्षात कोरोनाच्या उपद्रवामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे वळले. नफा असो वा तोटा, शेती पिकवायचीच हा श्रम साफल्याचा मंत्र अनुसरून शिवारात मोठी गर्दी पाहावयास मिळाली होती..
शेती उत्पादनासोबतीने भाजीपाला शेती, झेंडू, मोगरा, रताळी, हळद, कंदमुळे, वाल, पावटा, भुईमूग इत्यादी प्रकारची उत्पादने सध्या उन्हाळी हंगामात शेतकरी घेत आहेत. मुबलक पाणी, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश, रात्रीचा गारवा, खते व कीटकनाशकांची मात्रा यामुळे नैसर्गिक अशा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरणनिर्मिती होत असल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होऊन शेतकऱ्यांच्या पदरात केलेल्या कष्टाचे फळ मिळून भरघोस उत्पन्नाची शाश्वत हमी असल्याने रब्बीच्या हंगामात शेतकरी शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. केलेला खर्च व नफा यांचा योग्य ताळमेळ जुळत असल्याने येथील शेतकरी बांधवांनी वर्षासाठी दोन वेळा उत्पादन घेतले आहे. हा सिलसिला यापुढे असाच कायम राहील, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.