पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तीन हजार तरुणांचा कसून सराव
By निखिल म्हात्रे | Published: June 15, 2024 02:16 PM2024-06-15T14:16:19+5:302024-06-15T14:16:37+5:30
३९० जागांसाठी शुक्रवारपासून अलिबागमध्ये भरती प्रक्रिया
अलिबाग : पोलिस होऊन देशाची सेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची संधी रायगडमध्ये शुक्रवार, दि. २१ जूनपासन होणाऱ्या पोलिस भरतीमुळे होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सुमारे ३ हजार तरुण-तरुणी दररोज कसून सराव करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना काही संस्थांसह तज्ज्ञांची मोलाची साथ मिळत आहे. ३९० जागांसाठी पोलिस भरती अलिबाग जवळच्या नेहुली येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करत आहेत. या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी शारीरिक क्षमतेची तयारी करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात कसून सराव केला आहे. पहाटेपासून कुणी रस्त्यावर, तर कुणी जिल्हा स्टेडिअमवर भरतीची तयारी करताना दिसून येत आहे. पूर्वी पोलिस भरतीमध्ये रायगडमधील तरुणींची संख्या अल्प असायची. मात्र, आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तरुणांच्या बरोबरच तरुणीही पोलिस भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करण्यासाठी ग्राऊंडवर दिसतात. सध्या पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील युवक पहाटे किंवा सायंकाळी मोकळ्या मैदानात किंवा रस्त्याने धावताना दिसत आहे. प्रामुख्याने गोळा फेक, धावणे, जिम या कसरती करीत असल्याचे दिसून येत आहेत.
पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. शारीरिक क्षमता चाचणी व पेपरचा अभ्यास करीत आहे. सध्या मैदानी चाचणी परीक्षेची जोरदार तयारी करीत आहे. या परीक्षेत यश संपादन करणे हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
- अशांक साखरकर, पोलिस भरतीसाठी इच्छुक तरुण
भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळतेच असे नाही, म्हणूनच अनेकांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते. त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून जिल्हा पोलिस दलामार्फत भरतीत उतरणाऱ्या युवकांसाठी मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मागील वर्षी करण्यात आले होते. त्यामध्ये ३०० हून अधिक मुले-मुली सहभागी झाल्या होत्या.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक.