पोलादपूर : गेल्या दहा दिवसात पावसाचे तुफान सुरू असून तालुक्यात पावसाने ३ हजाराचा टप्पा पार केला असून ठिकठिकाणी आपत्ती ओढवली आहे. कशेडी घाटात गेल्या २४ तासात तीन वेळा दरड कोसळल्याने काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती तर रेवेवाडी- पैठण- कोतवाल रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या भोगाव हद्दीतील महामागाबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याने मार्ग बंद झाले होते. पावसाचे तुफान पुन्हा एकदा पोलादपूरकारांना अनुभवास आले असून ऑगस्टच्या पहिल्याच सप्ताहात ३ हजारांची सरासरी ओलांडली आहे. रविवारी सुमारे १५२ मिमी पावसाची नोंद झाली असून ९० टक्के पाऊस पडला आहे.तालुक्यात गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाट परिसरात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याने मातीचा सडा पहावयास मिळाला. रविवारी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी येथे पुन्हा दरड कोसळली. जेसीबीच्या साहायान सकाळी ७ वाजता रस्ता पूर्ववत करण्यात आला मात्र या भागात पावसाच्या पाण्या समवेत डोंगरवरची माती खाली येत असल्याने महामार्गावर मातीचा सडा पडल्याने वाहतूक संथगतीने मार्गस्थ होत होती.तालुक्यतील कोतवाल खुर्द रेववाडी पैठण- कोतवाल रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून रेववाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली असली तरी पादचारी आपला जीव मुठीत ठेऊन मार्गस्थ होत आहेत. हा मार्ग सुमारे तीन ते चार फूट खाली खचला असून अभ्यासकांकडून या मार्गाची पाहणी करत नव्याने रस्ता करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.बोरघर -कामथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद होती. येथील झाड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरु झाली आहे. तालुक्यातील आपत्तीसह दरडी नोंद आपत्तीमध्ये करण्यात आली असून महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी- कर्मचाºयांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कशेडी घाटात तीन वेळा कोसळली दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:54 AM