रूग्ण, नातेवाईक त्रस्त : आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयातील स्थितीआरमोरी : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड त्रस्त झाले आहेत. राज्य व संपूर्ण देशात स्वच्छता अभियानावर भर देण्यात येत असला तरी आरोग्याशी निगडीत असलेल्या आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. रूग्णालय परिसरातील शौचालयाच्या गटारातून दुर्गंधीयुक्त पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोरून वाहत असल्याचे चित्र आहे. याशिवाय इतर परिसरातही अस्वच्छता आहे. आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात आरमोरी शहरासह संपूर्ण तालुक्यातील तसेच लगतच्या देसाईगंज व कुरखेडा तालुक्यातीलही रूग्ण दररोज मोठ्या संख्येने औषधोपचारासाठी येतात. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वॉर्डांच्या बाजूने रूग्णालयाच्या गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असते. वैैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी व रूग्णांना या घाण पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने सदर उपजिल्हा रूग्णालयात रूग्ण व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी दोन वॉटर फिल्टर यंत्र पुरविले. मात्र येथून कोणालाही शुद्ध पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. अनेक नेत्र रूग्ण औषधोपचाराअभावी या रूग्णालयातून परत जात असल्याची माहिती आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही आरमोरी तालुक्यातील रूग्णांना व्यवस्थित आरोग्यसेवा मिळत नसल्याने रूग्णांमध्ये रोष दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आपण २५ जानेवारीला वडसा रूग्णालयाचा पदभार डॉ. सहारे यांच्याकडे सोपविला. माझ्या मुलाची पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा २८ जानेवारीला असल्याने मी पुणे येथे गेलो होतो, त्या संबंधाने रितसर वरिष्ठांकडे अर्ज सादर केलेला आहे. ग्रामीण भागातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे होती. रूग्णालयाच्या गटाराचे पाणी आहे ,ते दिसत आहे. आरमोरी रूग्णालयातून माझी बदली झालेली आहे. - डॉ. प्रमोद गवई, अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, आरमोरी.
रूग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा
By admin | Published: February 01, 2017 12:36 AM