कशेळे येथे चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:08 PM2019-10-13T23:08:05+5:302019-10-13T23:08:54+5:30
बँक आॅफ महाराष्ट्र बंद होण्याची अफवा : पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची झाली होती गर्दी
कर्जत : काहीच दिवसांपूर्वी पंजाब-महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेत त्यांच्या अर्थिक हिशोबात तफावत आढळल्याने रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर काही निर्बंध आणल्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांनी आपले स्वत:चे पैसे काढण्यासाठी संपूर्ण भारतातील शाखांबाहेर गर्दी केली होती. त्यानंतर अशाच प्रकारे देशातील नऊ बँका बंद होणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पसरले, बंद होणाऱ्या नऊ बँकांमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रचेही नाव असल्याने कर्जत तालुक्यातील कशेळे बँक शाखेच्या बाहेर खातेदार आणि ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन तीन महिला जखमी झाल्या; तर गुलाब जगताप
या महिलेच्या हाताचे बोट तुटले आहे. बँक बंद होणार या अफवेने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
कर्जत तालुक्यात कशेळे येथे बँक आॅफ महाराष्ट्रांची शाखा मागील ३५ वर्षांपासून अधिक काळ ही बँक येथील ग्रामीण भागातील लोकांना सेवा देत आहे. बँकेचे ३० हजारांहून अधिक खातेदार असून, कशेळे परिसरातील आदिवासी भागातील लोकांना सेवा देणारी एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे. बँक आॅफ महाराष्ट्राच्या कशेळे शाखेबाहेर लोकांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
बँक बंद होण्याच्या अफवेने नागरिक मोठ्या प्रमाणात बँकेबाहेर गर्दी करत असल्याने दररोज चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत तीन महिला जखमी झाल्या आहेत. कशेळे शाखेत खातेदार आणि ठेवीदार बहुतांश हे आदिवासी लोकच आहेत.
येथील बँक कर्मचारी, ही एक सरकारी बँक असून कधीच बंद होणार नाही, असे वारंवार त्यांना सांगत आहेत; परंतु खातेदार काही मन:स्थितीत नसून, ‘आम्हाला आमचे पैसे द्या’ हेच बोलत आहेत. दररोज हजारो खातेदार आणि ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करत असल्याने कर्मचारीही त्रासले आहेत.
पंजाब महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह आणि बँक आॅफ महाराष्ट्र यांचा काहीही संबंध नसून, बँक आॅफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक आहे, तरी ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बँक महाराष्ट्र ही कधीही बंद होणार नाही.
- अल्ताफ हुसैन, मॅनेजर, बँक आॅफ महाराष्ट्र,
शाखा कशेळे