डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर; विद्यार्थ्यांसाठी आव्हान तर शिक्षकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:28 AM2020-07-02T04:28:59+5:302020-07-02T04:29:14+5:30

अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

On the threshold of adopting digital learning methods; The challenge for students is the test of teachers | डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर; विद्यार्थ्यांसाठी आव्हान तर शिक्षकांची कसोटी

डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर; विद्यार्थ्यांसाठी आव्हान तर शिक्षकांची कसोटी

Next

संतोष सापते

श्रीवर्धन : व्यक्ती विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असते. शिक्षण हे व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्यातील महत्त्वाचे अवजार आहे. भारतीय समाज मन प्रगल्भ, जागृत, संवेदनशील, तसेच सजग करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. काळानुरूप शिक्षण पद्धतीमधील स्थित्यंतर आपण पाहात आला आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर आज आपण उभे ठाकलो आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

जीवनात घडलेल्या बदलांचा स्वीकार करून, त्याद्वारे अध्ययन व अध्यापन प्रगल्भ करण्याचे काम शिक्षकरूपी गुरुजनांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे. आजमितीस पुन्हा एकदा शिक्षणाच्या नव्या अध्यायास सुरुवात होत आहे. कोरोनामुळे शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितच काही निर्णायक बदल घडणार आहेत. आगामी काळामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील अंतर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी शिक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे आॅनलाइन शिक्षण हा पर्याय एकमेव आहे, असे निश्चितच नाही. शिक्षणाविषयी विविध मार्ग, पर्याय आजही उपलब्ध होऊ शकतात. त्यानुसार, जागृत पालकाने पुढाकार घेणे अगत्याचे आहे. कारण आज प्रत्येक घरातील शिक्षित आणि सुशिक्षित वर्गाची संख्या निश्चितच वाढलेली आहे. कोरोनामुळे घरात एक तरी व्यक्ती मुलांच्या नियमित सान्निध्यात राहू शकतात. घरात आई, बाबा, दादा कुणीतरी एक व्यक्ती घरात जर वेळ काढू शकला, तर मुलांचे शिक्षण निश्चितच सुरळीतपणे चालू शकते. नाहीतर तसेही खासगी शिकवणीला फक्त मुलांना रट्टा मारायला, घोकंमपट्टी करायला शिकवलं जातं ते निदर्शनात आलेला आहे. आज जवळपास सर्व शालेय पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यानुसार, पालकाने पुस्तक खरेदी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. आॅनलाइन शिक्षण पद्धतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होईल, असे वाटत नाही. नेटवर्कमधील अडचणी, घरातील आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणामधील उत्साह आवश्यक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याला मोकळं वातावरण, समवयस्क मित्र, प्रशिक्षित व मनमिळावू शिक्षक वर्ग या सर्व बाबी उपलब्ध असतात, तसेच अध्ययन व अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील ह्युमन टच हा शिक्षणासाठी निर्णायक असतो. आॅनलाइन शिक्षणामध्ये असे घडत नाही. त्याचप्रमाणे, सातत्याने डिजिटल शिक्षण घेताना मोबाइलचा अति वापर झाल्याने पाठ, मान, डोळे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.

अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा मुलगा इयत्ता नववीच्या वर्गात आहे. तो अभ्यासासाठी मोबाइल घेऊन बसतो. मात्र, थोड्या वेळातच त्याचे लक्ष विचलित होऊन तो मोबाइलमधील इतर अ‍ॅप्स चालू करतो. त्यामुळे मी व माझी पत्नी नियमित जवळपास दोन तास बसून पाठ्यपुस्तकातील दोन दोन प्रकरणे वाचून घेतो व नंतर त्याला समजावून सांगतो, असे पालक संदीप आव्हाड यांनी सांगितले.

सद्य:स्थितीत कोरोनामुळे शिक्षणात अनेक बदल होणार आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे आमचे दायित्व असेल, त्यानुसार आम्ही आमचे दायित्व पूर्ण करणार आहोत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊ.
- घनश्याम गायकवाड, शिक्षक, नगर परिषद, श्रीवर्धन

Web Title: On the threshold of adopting digital learning methods; The challenge for students is the test of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.