समुद्र किनारी 12 वर्षानंतर बैलगाडी शर्यतीचा थरार, दोघे जखमी
By राजेश भोस्तेकर | Published: March 7, 2023 07:57 PM2023-03-07T19:57:25+5:302023-03-07T19:57:51+5:30
अलिबाग समुद्र किनारी आयोजित बैलगाडी स्पर्धे दरम्यान दोन जेष्ठ नागरिक जखमी झाले.
अलिबाग : अलिबाग समुद्र किनारी बारा वर्षानंतर बैलगाडी शर्यतीचा थरार शौकिनाना अनुभवास मिळाला. मात्र झिराड आणि अलिबाग मधील दोन जेष्ठ शौकीन याना मात्र ही बैलगाडी शर्यत जीवावर बेतली आहे. अलिबाग समुद्र किनारी आयोजित बैलगाडी स्पर्धे दरम्यान दोन जेष्ठ नागरिक जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोघानाही उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
नारायण धर्मा गुरव रा. झिराड (७०) व विनायक जोशी रा. अलिबाग (७५) अशी जखमींची नावे आहेत. समुद्र किनारी बैलगाडी स्पर्धा पाहत असताना अंतिम फेरीच्या वेळी बैल बिथरले आणि गाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले. त्यांना अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. नारायण गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर नारायण गुरव यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर विनायक जोशी यांनादेखील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यत शौकीन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यत कुठेही असेल तरी स्पर्धा पाहण्यास मोठी गर्दी होत असते. मात्र आयोजकांनीही स्पर्धा घेताना प्रेक्षक मध्ये येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांनीही स्वतची काळजी घेणेही गरजेचे आहे.