अलिबाग - पावसाळी क्रिडा स्पर्धेला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शाळांमधील मैदानात खेळांचा थरार रंगणार आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थी, विद्यार्थीनींची शारीरीक क्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम शाळांमध्ये राबविला जाणार आहे.
शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांची बौध्दीक क्षमता वाढावी यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, भित्तीपत्रक, गायन, नृत्य स्पर्धा घेतली जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा एक प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी क्रिडा स्पर्धा भरविल्या जातात. नव्या वर्षात प्रवेश घेतल्यावर अनेक विद्यार्थ्यांना या क्रिडा स्पर्धेचा आनंद प्रत्यक्षात घेण्याची संधी मिळते.
वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी आपला संघ जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. जिल्ह्यातील शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये शिकविण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये एक तास शारिरीक शिक्षणासाठी दिला जात आहे. जूलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पाऊस कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यात या स्पर्धा घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, धावणे सारखे अनेक खेळांचे सांघिक व वैयक्तीक प्रकार घेतले जाणार आहेत. मोबाईलच्या जगतामध्ये रमणारी पिढी अशी ओरड कायमच असते. तासनतास ही मुले मोबाईलमधील खेळांमध्ये मग्न असल्याने त्याचा त्रास त्यांच्या आरोग्यावर होण्याची भिती अधिक असते. त्यामुळे शाळांमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत राहणार आहे.दप्तराविना शाळा -
आठवड्याचे सातही वार अभ्यासासाठी दिले जात असल्याने अनेक विद्यार्थी सतत अभ्यासामुळे कंटाळतात. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे. शाळेत येण्याची सवय राहवी यासाठी शासनाने दप्तराविना शाळा असा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मुक्तपणे खेळण्याची संधी दिली जाणार आहे. आठवड्याभराच्या शारीरिक, मानसिक त्रासा मुक्तता देण्याचा एक प्रयत्न शिक्षण विभागाने सुरु केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या आवडीचे खेळ घेतले जाणार आहेत.रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोकळेपणाने संवाद साधता यावा यासाठी दप्तराविना शाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. वेगवेगळे उपक्रम घेण्याबरोबरच वेगवेगळे खेळही या दिवशी घेतले जाणार आहेत.- कृष्णा पिंगळा गट शिक्षणाधिकारी.शाळांमध्ये पावसाळी वेगवेगळे खेळ भरविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी. मैदानी खेळाचे महत्व समजावे. मैदानी खेळ महत्वाचे आहेत, याची जाणीव क्रीडा स्पर्धेतून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढण्यास देखील खेळ महत्वाचे ठरत आहेत.- बीपीन शेळके सेवानिवृत्त शिक्षक