लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसला मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आग लागली. या आगीत एसटी बस जळून खाक झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बसमध्ये ५२ प्रवाशी होते.
महाड आगारातील मुंबई - फौजी अंबावडेला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २०६५ ही सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पनवेलहून पेणकडे जात होती. कर्नाळा अभयारण्य हद्दीत बस आल्यानंतर आग लागली. या आगीत एसटी बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या बसमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्नाळा अभयारण्य हद्दीतून जात असताना गाडीच्या गिअर बॉक्समधून धूर येत असल्याचे बसचालक महादेव नाटकर यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून ही बाब तात्काळ वाहकास सांगितली. बसमधील ५२ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे सामान व बस पूर्णतः जळून खाक झाले आहे. पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझविली. अचानक लागलेल्या आगीमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.