कुरुंगमधील मातीच्या बंधाऱ्यांना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 AM2018-07-22T00:35:40+5:302018-07-22T00:35:55+5:30
पहिल्याच वर्षी भेगा; ‘जलयुक्त शिवार’चा निधी वाया
कर्जत : तालुक्यात कुरुंग येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानात दोन ठिकाणी बांधलेल्या मातीच्या बंधाºयांमधून पाणीगळती सुरू आहे. बंधा-याच्या बांधाला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे मातीचे बंधारे फुटून वाहून जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे ‘जलयुक्त शिवार’ अभियानातील कामाबद्दल संशय निर्माण झाला आहे.
कृषी विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुं ग गावाची निवड २०१८ साठी करण्यात आली होती. तेथील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाने सलग समतर चर आणि मातीचे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कृषी विभागाने त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून दोन मातीचे बंधारे बांधले आहेत. सर्वत्र पाऊस होत असतानाही २० गुंठे क्षेत्र व्यापलेल्या मातीच्या बंधाºयात पाणीगळती होत असल्याने बंधाºयात पाणीच साचत नाही.
दुसरीकडे त्याच भागात कृषी विभागाने दुसºया एका ठिकाणी मातीचे बंधारे बांधले आहेत. त्यातील बंधारा बांधताना कृषी विभागाने पुरेशी काळजी न घेतल्याने बंधारे पावसाळ्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे बंधाºयाखाली असलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
आहे.
बांधाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने पाऊस थांबल्यास बंधारा रिकामा होऊ शकतो. मात्र, पावसाने कायम संततधार सुरू ठेवल्यास मातीच्या बांधाला पडलेल्या भेगामुळे बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधारा बांधताना मातीचा बांध हा दगडाने पिचिंग करून ठेवायचा असतो. ते न केल्याने बांधाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी मुरल्यास बंधारा पूर्णपणे निकामी होऊन वाहून जाऊ शकतो.
या भागात पाऊस चांगला झाला आहे. मात्र, कोणताही मातीचा बंधारा पाणीगळतीमुळे फुटून जाणार नाही, याची काळजी घेत आहोत.
- किरण गंगावणे,
कृषी सहायक