वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:38 PM2019-01-17T23:38:29+5:302019-01-17T23:38:34+5:30
सकारात्मक प्रतिसाद : ७७ प्रवचनकार १ हजार ८५८ गावांत करणार स्वच्छता प्रबोधन
अलिबाग : रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदायाची प्रवचने ही मोठी आणि प्राचीन परंपरा आहे. या वारकरी संप्रदायाशी प्रवचनाच्या माध्यमातून जोडली गेलेली हजारो गावे ग्रामस्थ आणि जनसमुदाय आहे. वारकरी प्रवचनकार आणि ग्रामस्थ यांच्यात भक्तीच्या माध्यमातून आगळ््या विश्वासाचे नाते आहे. या नात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर करण्याचा आणि प्रवचनांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्याच्या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्या संकल्पनेस जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील ७७ प्रवचनकारांनी तब्बल १ हजार ८५८ महसुली गावांमध्ये हा स्वच्छतेचा महाजागर करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवचनकारांच्या माध्यमातून सर्व महसुली गावांमध्ये स्वच्छतेचे संदेश प्रभावीपणे जाऊन स्वच्छता अभियान गतिमान होईल आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या प्रवचनकारांच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात हा स्वच्छतेचा महाजागर होणार असल्याचे रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेच्या स्व.प्रभाकर पाटील सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि रायगड जिल्हा वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महाजागराच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत यावलकर बोलत होते.
स्वच्छता संस्कृती जोपासण्यासाठी वारकरी मंडळी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करतील. स्वच्छतेबाबत समाज मतपरिवर्तनाचे काम वारकरी संप्रदाय उत्तम प्रकारे करेल,असा विश्वास या वेळी बोलताना रायगड जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ प्रवचनकार विठ्ठल महाराज पाटील यांनी व्यक्त केला. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंके, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, सहा. प्रशासन अधिकारी संजय वानखेडे, कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, आनंद धिवर, रायगड जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ प्रवचनकार विठ्ठल महाराज पाटील, ह.भ.प.गोपीनाथ महाराज पाटील आदी उपस्थित होते.