नवी मुंबई : समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. भरतीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे पाणी शहरात येऊ लागले असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई नियोजनबद्ध शहर असल्याचे बोलले जाते. परंतु शहराचे नियोजन चुकत असल्याचे सद्य:स्थितीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी समुद्राला भरती आल्यामुळे खाडीतील पाणी नाल्यांमधून वाशी, एपीएमसी ते कोपरीपर्यंत गेले होते. नाले तुडुंब भरून बाजार समितीजवळ पाणी रोडवर आले होते. यापूर्वी सीबीडीमध्ये भरतीचे पाणी पालिका मुख्यालयापर्यंत आले होते. जवळपास तीन फूट पाणी रोडवर साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्येही काही वर्षांपूर्वी भरतीचे पाणी शिरले होते. नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले शहर आहे. सिडकोने प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. शहरातील पाावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. होल्डिंग पाँडची व नाल्यांची साफसफाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे भरतीचे पाणी उरण-पनवेल रस्त्यावर उरण : सिडको, जेएनपीटीने केलेल्या अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे मंगळवारी ( ३०) समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. उरण परिसरात जेएनपीटी, सिडकोने विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर दगडमातीचे भराव केले आहेत. प्रचंड प्रमाणावर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या भरावामुळे मात्र, गावोगावी असलेल्या नैसर्गिक नाले, गटारे बुजून गेली आहेत. यामुळे दरवर्षी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी थेट काही गावागावांत शिरू लागले आहे. मंगळवारी (३०) तर समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरील सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयासमोरही समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहनांची गती मंदावली होती.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे अशा प्रकारे समुद्र भरतीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 2:29 AM