अलिबाग : मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेले काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी केलेल्या चुका आम्हाला भोगाव्या लागत आहेत, अशा कणखर शब्दात रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाचा समाचार घेतला.महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर ११ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून त्रास करून घेण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही, असाही टोला महेता यांनी लगावला. गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस अशीही रस्त्यावरच आलेली आहे. त्यांनी आता जमिनीवर पाय ठेवायला शिकले पाहिजे, आंदोलने कशी करायची हेही त्यांनी आता शिकले पाहिजे, असा सल्ला महेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी ुमान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ््या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश महेता यांचे आदेशराष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जत- खोपोली, कर्जत- मुरबाड आणि कर्जत- माथेरान हे रस्ते एमएमआरडीएने करावेत अशी सूचना केली आहे.गणेशोत्सवाच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड ताण पडतो. येथील वाहतूक सातारामार्गे वळवून त्या मार्गावरील टोलमधून १८ तारखेपर्यंत सूट देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.गणेशोत्सवात मुंबई-गोवा या महामार्गावर १०८ रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. पेंडॉल टाकून तेथे पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत. लोडशेडिंग बंद करण्याच्याही सूचना एमएसईबीला केल्या आहेत. श्रीवर्धन-म्हसळा-दिघी हा ५३ किमीचा रस्ता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने करावा, यासाठी दोन दिवसांत बैठक घेणार आहे.
१४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत पूर्णत: अवजड वाहतूक या मार्गावरून बंद करण्याचे आदेश रायगड पोलिसांना दिले आहेत. गणेशोत्सव काळात मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात येणार असून विविध कंपन्यांनी याबाबत सहकार्य करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.सरकारी रुग्णालयांमध्ये न्युरोलॉजिस्ट, हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांचे पथक औषधांसह सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही सूचित केले आहे.