आगरदांडा: कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगडचे पालकमंत्री- आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी २६ जुलैपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता, सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने खरेदी करणारे ग्राहाकांनी मच्छी खरेदीसाठी पाठ फिरवल्याने छोटे मच्छीमार कोळीबांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनला १२५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले, तरी लॉकडाऊन कमी होताना दिसत नाही. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या कोळी बांधवांचे, तसेच गरीब मजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने, ही अशीच परिस्थिती राहिली, तर जगायचे कसे, हा प्रश्न गरीब कोळीबांधवांना पडला आहे.
रोजच्या रोज लहान होड्यांतून समुद्र किनाºयाजवळील समुद्रात मच्छी पकडून आपला उदारनिर्वाह कसातरी करीत असतात. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मच्छी घेण्याकरिता ग्राहक नसल्यामुळे पकडलेली मच्छी रोजच्या रोज फुकट जात आसल्याने, कोळीबांधवांनी हाताश होऊन अखेर आपल्या होड्या किनाºयावर शाकारून ठेवण्यात आल्या.
कोळी बांधवांना कोणी वाली आहे का? हा प्रश्न पडला असून, कोळी बांधवांवर संकटावर संकट पडू लागले आहेत. आॅगस्ट, २०१९ पासून सुरू झालेल्या हंगमापासून तीन वादळे आणि लॉकडाऊन, तसेच निसर्ग चक्रीवादळ, यामुळे मच्छीमार पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शासन लॉकडाऊनवर लॉकडाऊन करत आहे.
कोळी समाजावर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने विशेष भरपाई पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी केली, तसेच निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजूनपर्यंत प्राप्त नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची दखल घेत त्वरीत मदत करावी, अशी मागणी केली आहे.