उरण : चौथे बंदर झाल्यास, भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या आणि रोजगार मिळणार असा कांगावा पिटणाऱ्या जेएनपीटीच्या चौथे बंदर भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्सने येथील समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीने नुकतेच २ नोहेंबर रोजी येथील मासेमारांना याबाबत नोटीस बजावली आहे. कंपनीच्या या नोटीसमुळे बंदर प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या चौथ्या बंदराच्या भरावाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाणजे आणि डोंगरी या गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. अगोदरच जेएनपीटी बंदरामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नसल्याने आता चौथ्या बंदरामुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना विस्थापित होण्याची पाळी आली आहे.दरम्यान, आयटीडी सिमेंटेशन कंपनीने या नोटिसा मागे न घेतल्यास सोमवार, १६ रोजी पाणजे ग्रामस्थांचा भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या साईट आॅफिसवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा प्रकल्पग्रस्त व स्थानिक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेव घरत, पाणजे सरपंच हेमलता पाटील आणि उपसरपंच विलास भोईर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर, रायगडचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आदींना दिला आहे.
उरणमधील चौथ्या बंदरामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: November 07, 2015 11:27 PM