शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवी - जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 06:51 PM2024-01-25T18:51:46+5:302024-01-25T18:51:54+5:30
चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मधुकर ठाकूर
उरण : शेती हा जुगार आहे.परंतु आधुनिकीकरणामुळे त्याच्यात बदल करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवीच. त्यामुळे शेतीची कास धरा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी चिरनेर येथे केले.
चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कृषी अधीक्षक बाणखेले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रियेवरची प्रशिक्षणे घेऊन, प्रक्रिया युनिट उभी करून उत्पादक कंपनी तयार करा. आणि त्याचा फायदा घ्या. उत्पादन प्रक्रियेची उद्योग कंपनीला मोठी गरज आहे. मात्र त्यासाठी प्रमुख घटक असलेल्या डायरेक्टर बोर्डाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. उरण तालुका शेतीच्या विकासाबाबत दुर्लक्षित राहिला आहे. आता तर इथे कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. यावर शेतकऱ्यांना मात करता येईल.
आपल्या जमिनीची विक्री न करता, कंपनी स्थापन करून कच्चा माल उपलब्ध नसेल तर बाहेरून आणून प्रक्रिया करून,उत्पादन तयार करा. प्रक्रिया तयार करून केलेल्या मालाला नक्कीच जास्त भाव मिळेल. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भात आणि नाचणी एवढेच आपण उत्पादन घेतो. भाताची विक्री केली तर आपल्याला किती भाव मिळतो. हे आपल्याला ठाऊक आहे .परंतु भातावर प्रक्रिया करून पोहे तयार करून त्या पॅकेजची विक्री केली, तर नक्कीच जास्त पैसे मिळतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडचा फणस जुन्नर पर्यंत पोहोचतो. त्याच्या बियांची पावडर केल्यास ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमीनीवर फड उभे करा. रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुपीक करा. कोकणात पारंपारिक शेती केली जाते. तिला बगल द्या. मधमाशा संपल्या, तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी निसर्ग वाचविण्याची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पोलीस पाटील संजय पाटील , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, सीए महादेव नवले, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, नमिता वाकळे, कृषी पर्यवेक्षक अलका बुरकुळ, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण ,कृषी सहाय्यक अदिका पानसरे, कृषी सहाय्यक सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.