खारेपाटात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार; आ. जयंत पाटील यांचं प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 08:22 PM2022-02-02T20:22:01+5:302022-02-02T20:22:39+5:30
नारंगी ग्रामपंचायतीच्या वास्तुचे उद्घाटन, आस विद्यालय अॅपचा शुभारंभ
अलिबाग - आगरी समाज आणि रायगडचा शैक्षणिक विकास ना.ना.पाटील यांनी केला आहे. तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्याच दृष्टीकोनातून खारेपाटात चांगल्या दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करायच्या आहेत असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. खारेपाटातील नारंगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते अॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरहरी म्हात्रे, तसेच पत्रकार रिद्धी प्रसाद म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आ. जयंत पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, खारेपाटाचा एक वेगळा इतिहास आहे. सदैव स्फुर्ती देणारा असा हा खारेपाट आहे. आगरी समाज आहे त्या ठिकाणी विकासाचे वेगळे चित्र दिसते. रायगडच्या आगरी समाजाची इंगजांमध्ये देखील दहशत होती. म्हणूनच इंग्रज रायगडकडे फिरकले देखील नाहीत. या समाजाकडे बुद्धीमत्ता आहे, आक्रमकता आहे. नारंगी ग्रामपंचायतीच्या टिमचे काम उत्कृष्ट चालले असून. मला अभिप्रेत असणारे काम होत असल्याने समाधान वाटते. त्यामुळे मी नारंगीसाठी दुप्पट निधी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच नारंगी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचे खरे श्रेय हे दातार काकांचे आहे. काम करणार्यांकडून चुका होतात. पण प्रामाणिकपणा ठेवला तर त्याला वेगळी धार येते. खारेपाटातील नाट्य संस्कृती टिकवली पाहिजे. भजन स्पर्धांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील नाट्य संस्कृती शहरात गेली पाहिजे अशी अपेक्षाही जयंत पाटलांनी व्यक्त केली. मते येतात जातात पण आपण केलेले काम कायम राहते. गेल्या काही वर्षात शेकाप पक्षाने अलिबाग तालुक्यात प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आता काम केले नाही तरी शेकापक्षाचाच आमदार येईल अशी परिस्थिती असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.