माणगाव : येथे व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. आपल्या शौर्याचा अतुलनीय पराक्रम करीत शत्रूंची धूळधाण उडविणाऱ्या माणगाव तालुक्यातील आंब्रेवाडी पळसगाव येथील शूरवीर व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव बाळाजी घाडगे यांना पाचव्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये असताना वीरमरण आले. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२१ साली झाला होता. तर त्यांना वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १० जुलै १९४४ रोजी वीरमरण आले. त्यांनी सुमारे १५० ते २०० शत्रूंचा खात्मा केला. त्या शूरवीराचे स्मारक इंग्रजांनी जुन्या माणगाव तहसील मैदानात बांधले आहे. घाडगे यांच्या शौर्यगाथेची दखल घेत तत्कालीन आमदार, मंत्री, पालकमंत्री तसेच उच्च अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली होती. ती सर्व आश्वासने हवेतच विरली असून, गेल्या १५ वर्षांत एकही आश्वासन पूर्णत्वाला गेले नाही, त्यामुळे तालुक्यातील माजी सैनिक आणि समस्त माणगावकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.दरम्यानच्या काळात अशोक साबळे यांच्या प्रयत्नातून वीर घाडगे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी छत्री बांधण्यात आली होती, ती आजही आहे. यापूर्वी वीर घाडगे यांचा स्मृतिदिन १७ जानेवारी होत असे. आता तो ९ जानेवारीला होत आहे. कारण त्यांची जन्मतारीखच कुणाला माहिती नव्हती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर खरी तारीख मिळाल्यावर हे शासकीय अधिकारी ९ जानेवारीला घाडगे उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरा करीत आहेत. त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंती उत्सवात वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येतो. यापूर्वी त्यांच्या जयंतीनिमित्त मिलिटरी भरती होत असे. त्या वेळी अनेक तरुण भरतीसाठी येत असत. आता ती आर्मी भरतीसुद्धा बंद करण्यात आली आहे.>वीरपत्नीच्या पदरी उपेक्षाशहीद यशवंत घाडगे यांचे मोठे स्मारक, संग्रहालय आणि सैनिक विश्रांतिगृह बांधणे तसेच इतर अनेक आश्वासने दिली गेली होती, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. वीर यशवंतराव घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घाडगे आज ९० पेक्षा जास्त वयाच्या आहेत. त्या आता माणगाव तालुक्यातील पाटणूस येथे माहेरी अंथरुणाला खिळून आहेत. इंग्रजांनी त्या काळात आंब्रेवाडी आणि पाटणूस येथे वीरपत्नीला वीर घाडगे यांचे शौर्य पाहून दोन घरे बांधून दिली होती. त्यातील आंब्रेवाडी येथील घर जीर्ण होऊन कोसळले आहे. ज्या घरात वीर घाडगे जन्मले होते आणि इंग्रजांना आपले शौर्य दाखविले होते ते घरही बांधले गेले नाही. ते घर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्या पदरी अद्यापही उपेक्षाच आली आहे.
शहीद यशवंत घाडगे यांची आज जयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 11:48 PM