महाड : महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवासाठी शनिवारी लाखोंचा जनसागर लोटणार आहे. पाच दिवसांपासून सुरू झालेल्या या छबिना उत्सवानिमित्त विरेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. सर्व जाती धर्मीय बांधव या यात्रौत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात, म्हणून हा उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक अशी ओळख निर्माण झाली आहे.शनिवारी सायंकाळपासून गावोगावच्या ग्रामदेवता वाजतगाजत मिरवणुकीने महाडच्या विरेश्वराच्या भेटीला येतात. मध्यरात्रीपर्यंत या ग्रामदेवताचे आगमन सुरूच असते. विन्हेरेच्या श्री झोलाई देवीचा मान या उत्सवात महत्त्वाचा मानला जातो. मध्यरात्री एक वा. नंतर झोलाई देवीचे आगमन थाटामाटात होते. ढोल, नगाºयाच्या निनादात या मिरवणुकीत भक्तगण बेभान होऊन नाचत असतात. सर्वात शेवटी झोलाई देवीचे आगमन झाल्यानंतर गोंधळ व अन्य विधिवत पूजा झाल्यानंतर विरेश्वर महाराजांसह सर्व ग्रामदेवताच्या पालख्या गाडीतळ परिसरात येतात. गगनाला भिडणाºया सासण काठ्या खांद्यावर घेऊन नाचवतानाचे दृश्य विलोभनीय असे असते. त्यानंतर पहाटे सुरू झालेल्या या पालखी मिरवणुकीची सकाळी मंदिरात सांगता होते. देवतांच्या दर्शनासाठी व खणा-नारळांनी ओट्या भरण्यासाठी सुवासिनींची अक्षरश: झुंबड उडते. विरेश्वर मंदिरात लळिताच्या कीर्तनाने या छबिना उत्सवाची सांगता होते.मंदिर परिसरात भरलेल्या या यात्रेत आकाशपाळणे, टोराटोरा यासह अनेक करमणुकीची साधने तसेच असंख्य दुकाने थाटण्यात आली आहेत. छबिना उत्सवात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी आदी पोलीस कर्मचाºयांची फौज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे, तर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, नगरपरिषदेने प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विरेश्वर देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, माजी सरपंच अनंत शेठ आदी पंच कमिटी सदस्य छबिना उत्सव साजरा होण्यासाठी मेहनत घेत आहेत.
महाडमध्ये आज लाखोंचा जनसागर लोटणार; विरेश्वर मंदिर परिसरात यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:59 AM