१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:51 AM2018-05-27T06:51:31+5:302018-05-27T06:51:31+5:30
रायगड जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
शनिवारी प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान यंत्रे व साहित्य वाटप करण्यात आले असून कर्मचारी व निवडणूक अधिकारी ५६२ मतदान केंद्रांवर वाहनांतून रवाना झाले आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंचपद ेतर एक हजार ६४७ पैकी ५५३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण १ हजार १४४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार असून २ हजार ५८२ उमेदवारांची लढत होणार आहे.
मतदान रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी५.३० वाजेपर्यंत होणार आहे. एकूण ५६२ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर अधिकारी व कर्मचारी असे एकूण ३ हजार ६७२ कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. कर्मचारी जाण्यासाठी व मतदान यंत्र घेऊन येण्यासाठी शासकीय वाहने, खाजगी शाळेच्या बसेसचा वापर करण्यात येत आहे. मतदान प्रक्रि या पार पडल्यानंतर मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी होमगार्ड व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात ९८ अधिकाऱ्यांसह ७५३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तावरील या कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी १०७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बंदोबस्तांमध्ये २७६ होमगार्ड, ८० आरपीसी तर अन्य १०७ कर्मचाºयांचा समावेश आहे. सहा स्ट्रायकींग फोर्स तुकड्यांसह एकूण ७५४ पोलीस कर्मचारी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मतदारांमध्ये निर्भयतेचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता रेवदंड्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी पोलिसांचे पथसंचलन झाले.