निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
By निखिल म्हात्रे | Published: March 17, 2024 06:40 PM2024-03-17T18:40:58+5:302024-03-17T18:41:59+5:30
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे.
अलिबाग- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगामार्फत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.आवश्यक ती कार्यवाही करेल अशी माहिती किशन जावळे यांनी दिली आहे.