उरण : दास्तान, चिर्ले, करंजाडे टोलनाके बंद केल्याने बेरोजगार झालेल्या ३०० स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांनाच घेराव घातला. प्रकल्पासाठी जमिनी घेवून प्रकल्पग्रस्तांनाच देशोधडीला लावू पाहणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा जेएनपीटी बंदरावरील राष्ट्रीय महामार्गच उखडून टाकू, असा इशारा संतप्त कामगारांनी दिला आहे.जेएनपीटी महामार्गावर असलेले दास्तान, चिर्ले, करंजाडे टोलनाके बंद केले आहेत. त्यामुळे या टोलनाक्यावर मागील ११ वर्षांपासून काम करणारे ३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. ११ वर्षांपासून काम करणाऱ्या या कामगारांना इतर सुरू असलेल्या अन्य प्रकल्पात सामावून घेण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने धुडकावून लावली. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक प्रशांत फेगडे यांनाच कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली ३०० कामगारांनी घेराव घातला. यावेळी सुरेश पाटील, समाधान कोळी, प्रशांत खुटले आदिंचा समावेश होता. प्रकल्पांसाठी जमिनी घेवून प्रकल्पात सेवानिवृत्तीपर्यंत कायम नोकरी देण्याचे आश्वासन देणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापकांना संतप्त कामगारांनी धारेवर धरून जाब विचारला. जेएनपीटी बंदर मार्गावरील टोलनाके बंद केले असले तरी जेएनपीटी बंदराच्या प्रवेशद्वारावर एका कंटेनरमागे २६० म्हणजे दुप्पट टोल वसुली करीत आहे. त्यामुळे दुप्पट नफा कमवित आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाने ३०० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा जेएनपीटी बंदरावरील राष्ट्रीय महामार्गच उखडून टाकू, असा इशाराही संतप्त कामगारांनी यावेळी दिला आहे. संतप्त कामगारांच्या धमकीवजा इशाऱ्यामुळे हतबल झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक प्रशांत फेगडे यांनी जेएनपीटी, सिडको, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनासमोर प्रश्न मांडून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)
महामार्गाच्या व्यवस्थापकांना टोलनाका कामगारांचा घेराव
By admin | Published: July 09, 2016 3:36 AM