पोलादपूर : मावळा जवान संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील ऐतिहासिक समाधीवर दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊंचा समाधी परिसर शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. पाचाड, रायगड, महाड परिसरातील कष्टकरी महिलांना साड्या चोळ्यांची भाऊबीज भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंच्या जय घोषात मावळ्यांनी राजमाता जिजाऊंना वंदन केले.
समाधीवर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांच्या वंशजांनी दीपोत्सव साजरा करून शिवकाळ जागा केला. राजमाता जिजाऊ यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळावर झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कष्टकरी महिलांना भाऊबीज भेट देण्यात आली.
शुर योद्धा गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड, सुभेदार सुयार्जी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, रायप्पाचे वंशज शरद मोरे, रायगड किल्ल्याचे अभ्यासक सुधाकर लाड, सरदार हिरोजी तनपुरे यांचे वंशज विजय तनपुरे, संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, आण्णासाहेब चव्हाण, शिवव्याख्याते तानाजी मरगळे , संदीप दळवी, संजय भिताडे, ज्ञानेश्वर कामथे, कृपालराजे महाडीक आदींसह रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई आदी ठिकाणच्या महिला, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन मावळा जवान संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित नलावडे व अविनाश रांजणे यांनी केले.वैभवशाली शिवकाळ जिवंत झाला-मालुसरेडॉ. शितल मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाच्या पाठीवर सर्वप्रथम लोकशाहीवादी स्वंतत्र राष्ट्र निर्माण केले त्या हिंदवी स्वराज्याचा रणसंग्राम राजमाता जिजाऊ यांच्या त्यागाने अजरामर झाला आहे असे सांगितले. चंद्र सूर्य असे पर्यंत राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र मानवतावादी कायाचा अनमोल ठेवा सदैव तेवत राहणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व वीर मावळ्यांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा यासाठी प्रथमच मावळा जवान संघटनेच्या वतीने दीपोत्सव व कष्टकरी महिलांना भाऊबीज भेट देऊन मानवंदना दिल्याने रायगडाच्या मातीत वैभवशाली शिवकाळ जिवंत झाला असल्याचे सांगितले.