- जयंत धुळप
नवी मुंबई - येथील निलेश शशिकांत दास याच्या खून प्रकरणी त्याचाच मित्र तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित याला दोषी ठरवून येथील रायगड जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मु.गो. सेवलीकर यांनी भा.द.वि.कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तिन महिने साधी कैद तर भा.द.वि.कलम २०१ अन्वये तिन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरी अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दरम्यान या खटल्यातील सहआरोपी मृत निलेश शशिकांत दास याची पत्नी कोरीना निलेश दास हिला सबळ पूराव्या अभावी न्यायालयाने निर्देष मूक्त केले आहे.
अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी खून
मृत निलेश शशिकांत दास व आरोपी तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित दोघे मित्र होते. दहा वर्षापूर्वी वाशी येथे रहात असताना, निलेश शशिकांत दास यांची पत्नी कोरीना हीचे तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित यांच्या बरोबर अनैतिक संबंध जुळले. या अनैतिक संबंधांची माहिती निलेश यांस समजली. अनैतिक संबंधामधील निलेशचा अडथळा दूर करण्याच्या हेतूने तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित आणि निलेशची पत्नी कोरीना या दोघानी संगनमत करुन निलेश दास यास ठार मारण्याचा निर्णय घेतला.
वाशी मध्ये खून करुन, मृतदेह टाकला पनवेल मध्ये
वाशीतील नवनाथ नगर झोपडपट्टी मध्ये निलेश शशिकांत दास याचा तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित आणि निलेशची पत्नी कोरीना या दोघांनी २५ ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री मासे कापण्याच्या कोयत्याने (काती) मानेवर व हातांवर वार करुन ठार मारले. आणि २६ ऑक्टोबर २०१३ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निलेशचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं.१च्या जवळील मालधक्का झोपडपट्टी मधील मोकळ्य़ा जागेत टाकला. या खून प्रकरणी पनवेल शहर पोलीसांनी गून्हा दाखल करुन तपासांती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती या खटल्यातील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड.अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी दिली.
नऊ साक्षीदारांपैकी तिन साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या खटल्याच्या सूनावणी दरम्यान न्यायालयात सरकार पक्षा तर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड.अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी नऊ साक्षिदारांच्या साक्षी नोंदविल्या. साक्षीदार कृपा मैलापतुल्ला, किशोर पवार आणि पोलीस निरिक्षक प्रफूल्ल भिंगार्डे या तिघांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षी आणि न्यायालयात युक्तीवादा दरम्यान दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरुन तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित यास दोषी ठरवून ही शिक्षा सूनावली आहे.