अलिबाग कृषी पर्यटन विकासने रॅलीतून केली पर्यटन जागृती
By admin | Published: September 28, 2016 02:40 AM2016-09-28T02:40:19+5:302016-09-28T02:40:19+5:30
अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त मांडवा जेट्टी ते अलिबाग समुद्रकिनारा अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग : अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त मांडवा जेट्टी ते अलिबाग समुद्रकिनारा अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटारसायकल रॅलीचा समारोप अलिबाग येथे करण्यात आला.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर पर्यटकांना खुणावत आहे. मांडवा ते अलिबाग हा परिसर तर मुंबईकर पर्यटकांसाठी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात रु जला आहे. हा पर्यटन व्यवसाय अधिकाधिक पुढे नेण्यासाठी अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने पर्यटनविषयक जागृती करण्यासाठी मांडवा ते अलिबाग मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
मोटारसायकल रॅली मांडवा जेट्टी, धोकवडे, सासवणे, आवास, किहीम, थळ, बुरु मखाण, वरसोलीमार्गे अलिबाग अशी काढण्यात आली होती. रॅलीमध्ये २० मोटारसायकल्स होत्या. त्यावरील पर्यटन व्यावसायिक पर्यटनवृद्धीबाबतच्या घोषणा देत होते.
संस्थेमार्फेत दरवर्षी रक्तदान, समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर, शहर सुशोभीकरण या कामांचा सहभाग आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.