नवी मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटकांना अर्थात तंबूतील निवासाचा आनंद लुटण्यासाठी आता लेह लडाख, राजस्थान किंवा कच्छच्या रणात जाण्याची गरज भासणार नाही. कारण, राज्यात आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहिमच्या समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. राज्याच्या नव्या पर्यटन धोरणांतर्गत एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने ही टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खासगीकरणातून ती बांधण्यात येत आहे. बांधा-वापरा-संचलन तत्त्वावर खासगीकरणातून तिचे काम गुजरातमधील एका खासगी कंपनीस देण्यात आले आहे.
राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग या पर्यटन स्थळाला लागूनच असलेल्या किहिमच्या समुद्र किनाऱ्यावर ही टेंट बांधण्याचे कंत्राट ‘एमटीडीसी’ने अहमदाबाद च्या ‘प्रवेग लिमिटेड’ या कंपनीस दिले आहे. इकोफ्रेंडली आरामदायी हॅाटेल्स आणि टेंटसह रिसॉर्ट बांधण्यात कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. ही कंपनी किहिमच्या किनाऱ्यावर येत्या पाच वर्षांत ही टेंट सिटी बांधणार आहे.
अशी असेल टेंट सिटीकिहिमच्या समुद्र किनाऱ्यावर एमटीडीसीच्या मालकीच्या साडेसहा एकरावर ही टेंट सिटी बांधण्यात येत आहे. याठिकाणी प्रवेग कंपनी ४० उच्च दर्जाचे आरामदायी टेंट बांधणार आहे. टेंटशिवाय सभागृह, रेस्टॉरंट आणि डायनिंग एरिया, इनडोअर आणि आउटडोअर खेळाचे करमणूक उपक्रम, योगा आणि आयुर्वेदिक उपचार केंद्रासह सांस्कृतिक केंद्र, वैद्यकीय कक्षाची सोय राहणार आहे.
रायगडच्या पर्यटनाला मिळणार चालनामुंबई आणि पुण्यानजीकचा आणि ऐतिहासिक रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ल्यास अनेक गडकोट असलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात अलिबाग, किहिम, काशीद, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन-म्हसळा सारखी सुंदर बिचेस आहेत. याशिवाय कर्नाळा पक्षी अभयारण्यासह नानाविध पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. बोटीनेही येथे मुंबई, नवी मुंबईतून येजा करता येते. रेवस-मांडवाहून मोरा, मुंबई भाऊचा धक्का अशी जलवाहतुकीची सोय येथून आहे. आता याच जिल्ह्यात टेंट सिटी बांधण्यात येत असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आपसूक चालना मिळणार आहे.