आगरदांडा : कोकणातील पर्यटनस्थळ आणि समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. वातावरणात गारवा आणि सौम्य उबदारपणा आल्याने पर्यटक आनंदी आहेत आणि त्याची मजा घेताना दिसत आहेत. पर्यटनप्रेमी मुरुड तालुक्यातील काशीद, नादगांव, चिकणी, राजपुरी समुद्रकिनारपट्टीवरून मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहेत.मुरुड सध्या मस्त गुलाबी थंडीचा मोसम असून, तापमानाचा पारा १९ से.इतका खाली घसरला आहे. कोकण म्हणजे हिरवीगार, वनश्री डोंगर-दऱ्या जंगलभागातून जाणारे नागमोडी रस्ते, सकाळाच्या प्रभारी दिसणारी धुक्याची चादर प्रेमळ माणसे असे चित्र ओतप्रोत दिसते. कोकणात प्रदूषण नाही, कोकण म्हणजे चैतन्याचा आणि मनाला तारुण्याची उभारी देणारा. कोकणची तांबडी माती, विलोभनीय निसर्ग, ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्यावेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचताच प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने, पर्यटक ज्येष्ठ नागरिक व असंख्य महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बोटींच्या हेलकाव्यामुळे किल्ल्यात उतरणे फार कठिण होते, अशा वेळी उतरताना मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो.
गुलाबी थंडीबरोबर बहरू लागले कोकणातील पर्यटन, मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:28 PM