पर्यटकांना आठवडा बाजारचे आकर्षण

By Admin | Published: January 9, 2016 11:47 PM2016-01-09T23:47:19+5:302016-01-09T23:47:19+5:30

निसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे.

Tourist Attraction of the Week | पर्यटकांना आठवडा बाजारचे आकर्षण

पर्यटकांना आठवडा बाजारचे आकर्षण

googlenewsNext

- जयंत धुळप, अलिबाग
निसर्गरम्य वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, दूरवर पसरलेला समुद्रकिनाऱ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील आठवडा बाजारची भुरळ पडत आहे. १३३ वर्षांची प्राचीन आठवडा बाजार सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
१८८३ मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर, आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी आणि महाड तालुक्यात महाडला आठवडा बाजार भरण्यास प्रारंभ झाला.
ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले हा बाजार तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरला आहे.
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही एक मोठी दैनिक बाजारपेठ आजही सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे दर सोमवारी मोठा आठवडा बाजारही भरतो. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रेते आणि १ हजार १०० खरेदीदार येत असत तर हटाळे-नागावच्या आठवडे बाजारात प्रांरभीच्या काळात १५ विक्रेते व १०० खरेदीदार येत असत.
१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडे बाजार भरत असे. १८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा आठवडे बाजार भरत असत.
काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडे बाजार सुरू झाले. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली आणि सहाण या दोन आठवडे बाजारांचा समावेश आहे.

आठवडा बाजारातील खरेदीची मौज
जिल्ह्यात भरणाऱ्या आठवडे बाजारांपैकी अनेक बाजार हे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आहेत. तर अनेक बाजार सागरी किनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने येथे पर्यटक आवर्जून थांबतात. मॉलच्या तुलनेत आठवडे बाजारात घासाघीस करून माल खरेदी करण्याची मजा काही औरच असल्याचे पिंपरी चिंचवड येथून आलेले आणि हाटाळे-नागांवच्या आठवडे बाजारात खरेदी करणारे दत्ता सरपोतदार यांनी सांगीतले.

थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतल्याचा आनंद
मॉलमध्ये जे मिळत नाही ते या आठवडे बाजारात मिळते. मातीशी नेमके नाते सांगणारा हा बाजार गावाच्या वातावरणाचा आनंद देतो, अशी प्रतिक्रिया अंधेरीच्या प्रतिभा देव यांनी दिली. शेतकऱ्याच्या हातून तांदूळ, नारळ, वाल, चणे आदी थेट विकत घेताना आनंद आणि समाधान मिळते. शिवाय दलालांऐवजी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळत असल्याने दोन पैसे जास्त देण्याची तयारीही यावेळी असल्याचे अंधेरीच्याच विद्या जावकर यांनी सांगितले.

Web Title: Tourist Attraction of the Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.