शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:08 AM2018-11-19T00:08:17+5:302018-11-19T00:08:36+5:30

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररूपी इतिहास कोरण्यात आला आहे.

Tourist center attraction of Shivtirth | शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररूपी इतिहास कोरण्यात आला आहे. इतिहास जिवंत करणारी चित्रे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अलिबागच्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये आता शिवतीर्थ इमारतीचा समावेश झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र सरकारने यामध्ये फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे मोठ्या जिद्दीने पाटील यांनी शिवतीर्थ इमारत उभारली होती. शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण हे रायगड किल्ला होता. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड असे केले. त्याच रायगड जिल्ह्याच्या अलिबाग या राजधानीच्या ठिकाणी पाटील यांनी इमारत बांधून त्या इमारतीला यथोचित असे शिवतीर्थ नाव दिले.

शिवाजी महाराजांचा चित्ररूपी इतिहास पाहण्यासाठी गर्दी
इमारत बांधून झाल्यावर त्या इमारतीच्या दर्शनी भागावर शिवाजी महाराजांचा जीवनपट त्यांच्याच कल्पनेतून निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे चित्र आहे.
सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे समुद्र किनारी जाणारे पर्यटक या शिवतीर्थ इमारतीजवळ आल्यावर त्यांची पावले आपोआप थांबतात. अतिशय आकर्षक असणारी चित्रे त्यांचे लक्ष वेधून घेतात. शिवाजी महाराजांच्या इतिहासाने जिवंतपणा आलेल्या या इमारतीसोबत काही पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही.
अलिबाग, आक्षी, नावगाव, वरसोली, कुलाबा किल्ला येथील विविध हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची सातत्याने गर्दी असते. ही ठिकाणे पर्यटकांची आवडीची असल्याने येथील समुद्र किनारी ते पुन्हापुन्हा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. या पर्यटन स्थळांबरोबरच रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत असल्याचे पर्यटकांच्या संख्येवरून दिसून येते.

इमारतीवर रेखाटली ताम्रपत्राप्रमाणे चित्रे
रायगड जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वीच इमारतीची डागडुजी केली आहे. त्याचवेळी शिवाजी महाराजांच्या चित्ररूपी जीवनपटाचेही नूतनीकरण केले आहे. ताम्रपत्रावर चित्र रेखाटल्याप्रमाणे या चित्राची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पर्यटन केले आहे, मात्र शिवतीर्थासारखी बांधलेली इमारत पाहिली नाही. शिवरायांचे जीवन चित्र उत्तमपणे रेखाटलेले आहे. चित्रांकडे पाहिले की ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचे पर्यटक शीतल सोनावणे यांनी सांगितले.

Web Title: Tourist center attraction of Shivtirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड