जुम्मापट्टी, माथेरान घाटात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:28 AM2020-06-18T01:28:17+5:302020-06-18T01:28:23+5:30
आदिवासींची पोलिसांत तक्रार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांत भीतीचे सावट
कर्जत : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून जनतेला सूट देण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेतला जात असून, ठाणे जिल्ह्यातील असंख्य पर्यटक सध्या नेरळ-माथेरान घाटात आणि जुम्मापट्टी येथे येत आहेत. या अनपेक्षित पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक आदिवासींनी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन या पर्यटकांना आवरा अशी विनंती केली असून, त्या सर्वांना नेरळच्या हुतात्मा चौकातून परत पाठवावे, असे आवाहन आदिवासी संघटनेने केले आहे.
पावसाळ्यात कर्जत भागातील धबधबे आणि रिसॉर्टवर मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत असतात. यंदाही पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा नेरळ-माथेरान घाट रस्त्यात आणि जुम्मापट्टी येथे वळवला आहे. दरवर्षी हा परिसर पावसाळ्यात तीन महिने पर्यटकांनी ओसंडून वाहत असतो. गेले काही दिवस नेरळमध्ये ठाणे जिल्ह्यातील पर्यटक दुपारनंतर आपली वाहने घेऊन येत आहेत. त्यात मागील चार दिवस तर मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन बदलापूरपासून डोंबिवलीपर्यंतचे हौसे नेरळमध्ये येत आहेत. त्यांची वाहने ही जुम्मापट्टी येथे नॅरोगेज मार्गावर असतात.
लॉकडाऊनपासून नेरळ-माथेरान घाटरस्ता पूर्णपणे बंद असून, माथेरान १७ मार्चपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटक येण्याची शक्यता नाही. मात्र, अनलॉकनंतर नेरळ-माथेरान घाट पर्यटकांनी फुलून गेला आहे. शनिवार, रविवार तर ३०० हून अधिक वाहने ठाणे जिल्ह्यातून येथे येतात. त्यामुळे स्थानिक आदिवासी ग्रामस्थ नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले. जैतू पारधी यांच्यासह आदिवासी लोकांनी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी पाटील यांनी तत्काळ गाडी पाठवून जुम्मापट्टी भागात ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांना तेथून बाहेर काढले. तरीही पर्यटक येण्याचे प्रकार दररोज सुरू आहेत. त्यामुळे नेरळ पोलिसांसमोर पेच निर्माण झाला असून हे रोखण्यासाठी पोलीस एक चौकी उभारणार आहेत.
‘जुम्मापट्टी भागातील आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आम्ही तत्काळ तेथे पोहोचून ठाणे जिल्ह्यातून आलेल्या लोकांना बाहेर काढले, पण ही कारवाई सतत करण्यापेक्षा आम्ही माथेरान घाटरस्ता ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या हुतात्मा चौकात बॅरिकेट्स लावून पर्यटकांना अडवणार आहोत. पर्यटकांनी या भागात येऊ नये; अन्यथा कारवाई केली जाईल.’
- अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ.
‘जुम्मापट्टी परिसरात १२ आदिवासी वाड्या असून, लॉकडाऊनमुळे आमच्या भागातील तरुणांचे माथेरान येथील रोजंदारीचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यात रेड झोनमधील लोक आमच्याकडे कोरोना घेऊन येऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कर्जत-कल्याण रोडवरील हुतात्मा चौकातच अडवून परत पाठवावे.’
- जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ता