माथेरान : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख या पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. यामुळे येथील नवशिक्या घोडेस्वारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे.
२५ जानेवारीला मोहम्मद आपली पत्नी व मित्र असे चौघे जण माथेरानमध्ये फिरण्यासाठी आले होते. २५ जानेवारीला दुपारी ते घोडेस्वारीसाठी येथील हार्ट पॉइंटच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी मोहम्मद काशीद इम्तियाज शेख यांचा घोडा अचानक जोरजोरात पळू लागल्या. त्यानंतर घोड्यावर बसलेल्या मोहम्मद यांचे घोड्यावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी माथेरानमधील बीजे हॉस्पिटल येथे प्रथम उपचारासाठी नेले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना उल्हासनगर येथील मॅक्स लाइफ हॉस्पिटल येथे नेण्यात आले, त्यावेळी त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्यात आले होते.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. ही कागदपत्रे माथेरान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सहायक फौजदार आर. व्ही. रामदास हे पुढील तपास करीत आहेत.