कर्जत : महाराष्ट्रातील गडकोट हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. मात्र, पर्यटक येथे दारू पिऊन मज्जा मस्ती करणे, अश्लीश चाळे करणे, तलाव व पाण्याच्या टाक्यात पोहणे, तोफांवर बसणे असे प्रकार करत आहेत, त्यामुळे येथे विद्रूपीकरण होत आहे, याची दखल संबंधितांनी घ्यावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे.
आज जरी गड-किल्ले संरक्षित किंवा असंरक्षित स्मारक असले तरी त्याचे पावित्र्य बिघडविण्याचे काम हौशी पर्यटकांकडून होत आहे. संरक्षित स्मारकावर राज्य आणि केंद्र पुरातत्त्व विभागाने जिथे २५ रुपये एवढा तिकीट दर आकारला जातो तेथे त्यांनी गड-किल्ल्यांच्या वास्तूंची होणारी हानी व विटंबना याकडे लक्ष दिले पाहिजे. लोहगडावर पुरातत्त्व विभागाने सुरक्षारक्षक वाढवावे आणि गडावर चारही बाजूला फिरत राहावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे पर्यटक किल्ल्यात अवघड ठिकाणी जाऊन अपघात होत असतात त्यावरही तोडगा निघेल आणि लोकांचे प्राण वाचतील. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांवर होत आहेत. २१ जुलै रोजी लोहगडावरील त्रंबक तलाव व पाण्याच्या टाक्यात पर्यटक पोहत व लघुशंका करत होते. या तलावातील पाण्याने तलावाशेजारी आलेल्या महादेव मंदिरात शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो, तसेच गडावरील तलाव व पाण्याचे टाके यातील पाणी हिवाळा व उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या महिन्यात कोथळीगडावर दारूची पार्टी करत होते. राजगडावर एका प्रेमीयुगलाकडून अश्लीश चाळे करण्याचा फोटो सोशल मीडियावर आला. तर विसापूर किल्ल्यावर पर्यटक अवघड ठिकाणी अडकले होते. पावसाळ्यात मज्जा मस्ती आणि पर्यटन करण्यासाठी हौशी पर्यटक हे गड-किल्ल्यांवर जातात, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.निवेदनाद्वारे तक्रारच्पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही तर केंद्र पुरातत्त्व विभागाच्या विरोधात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई सर्कल यांना, स्थानिक पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन तक्रार करण्यात आली आहे.