रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाउसफुल्ल, महानगरात संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:23 PM2020-12-24T23:23:08+5:302020-12-24T23:24:04+5:30
Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
रायगड : काेराेनाच्या प्रभावानंतर सरकारने आता वाॅटर स्पाेर्ट्स आणि नाैकानयनला परवानगी दिली आहे. नाताळ सणासह थर्टी फर्स्टचा दुहेरी आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात माेठ्या संख्येने पर्यटक दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये असे आदेश जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी अद्याप दिलेले नसल्याने संभ्रम कायम आहे.
काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रे खुली केली आहेत. व्यवहार सुरळीत हाेत असल्याने बाजारांमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेले सातआठ महिने नागरिक आपल्या घराबाहेर पडले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हाेम क्वारंटाइन करून घ्यावे लागले हाेते. सातत्याने घरात राहिल्याने बाहेर पडताच आले नसल्याने जीवन कंटाळवाने झाले हाेते. आता काेराेनाचा उद्रेक बऱ्यापैकी थांबत असल्याने सरकारने पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वाॅटर स्पोर्ट्स नाैकानयन आणि मनाेरंजन पार्कचेही टाळे उघडले आहे. काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे, तर त्यापाठाेपाठ थर्टी फर्स्ट साजरा करण्यात येणार आहे. सरकारने वेळेवर शिथिलता दिल्याने पर्यटक माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच फुलून गेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत
- हाॅटेल, रेस्टाॅरंट, लाॅजिंग काॅटेजही पर्यटकांनी व्यापली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये काेराेनाने आपले रूप बदलल्याचे पुढे आले आहे. ७० टक्के या काेराेना विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेत असल्याने सर्वच जगासाठी ही धाेक्याची घंटा आहे. नव्या काेराेनापासून बचाव करण्यासाठी परदेशी पर्यटकांवर सरकारने निर्बंध घातले आहेत.
- गर्दी हाेऊ नये, यासाठी महानगरमध्ये सरकारने नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले नाहीत.
- महानगरामध्ये नियम लावले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमध्येही ते लागू हाेण्याची शक्यता आहे. आदेश नसल्याने व्यापारी, हाॅटेल व्यावसायिक, पर्यटक यांच्यामध्ये मात्र त्यामुळे संभ्रामाचे वातावरण आहे.