मुरुड बीचवर पर्यटकांची पुन्हा हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 12:20 AM2016-02-07T00:20:36+5:302016-02-07T00:20:36+5:30
मुरुड हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची खूप गर्दी असते. मात्र १ फेब्रुवारी या दिवशी पुण्यातील आबिदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल मुरुडकिनारी आली होती.
आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची खूप गर्दी असते. मात्र १ फेब्रुवारी या दिवशी पुण्यातील आबिदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल मुरुडकिनारी आली होती. त्यामधील १४ मुलांचा समुद्रात बुडून अंत झाला. या दुर्घटनेनंतर दोन-तीन दिवस पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र वीकेंड सुरू होताच पुन्हा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे.
मुरुडचा प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र अपघातानंतर पर्यटनाबरोबरच किनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांवरही परिणाम झाला असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
किनाऱ्यावरील अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी फ्लोटिंगबॉल लावण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दलाकडून गस्तही वाढविण्यात आली आहे. पर्यटकही समुद्रात जाण्याऐवजी किनाऱ्यावर अथवा वाळूत खेळणे पसंत करीत आहेत. तर काही पर्यटक केवळ बोटिंगची मजा घेत आहेत. (वार्ताहर)