- गणेश चोडणेकरआगरदांडा : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत. सुमारे दोन लाख पर्यटक याठिकाणी दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे लाखो रु पयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी समुद्रकिनारच्या हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व फार्महाउसवर पसंती दिली आहे. मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला, काशीद, कोर्लई किल्ला, चिकणी, बारशीव, सवतकडा, दत्तमंदिर, गारंबीअशा तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटच्या मालकांनी विद्युत रोषणाई व डीजे नाईट पार्टीची सोय केली आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या हॉटेलमध्येही पर्यटकांना विविध मनोरंजनाचे खेळ, आॅर्केस्ट्राची व्यवस्था तसेच कोकणी, गोमांतक, कोळी, आगरी अशा मांसाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध बाइक , घोडे, एटीव्ही राइड, उंट सवारी यांचा मनमुराद आनंद लुटत यावा यासाठी त्या त्या मालकांनी जय्यत तयारी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुरुड-जंजिरा नगरपरिषद तीन दिवस पर्यटन महोत्सव साजरा करणार आहे.तालुक्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरुड पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपनिरीक्षक व २० पोलीस कर्मचारी आणि १० होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध चेकपोस्ट वाहनांची तसेच मद्यपान करून वाहन चालविणाºयांची तपासणी केली जाणार आहे.किनाºयावर आतापर्यंत आलेल्या पर्यटकांसानी सुचनांचे पालन करावे यासाठी प्रशासनाने जागोजागी सुचनाफलक लावलेले आहेत. रूग्णवाहीकाही तैनात करण्यात आल्या आहेत. एकूणच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.या आठवड्यात पर्यटकांच्या गर्दीत दुपट्टीने भर पडली असून, समुद्र किना-यावरील छोट्या व्यावसायिकांच्या गल्ल्यातही भर पडली असून, त्यांच्यासाठीही एक पर्वणीच आहे.दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही मुरूड तालुक्यातील समुद्र किनारे गर्दीने फुलले असून, पर्यटकांमध्येही उत्साह पहायला मिळत आहे. किनाºयांसोबतच अनेक पर्यटन स्थळेही खुली ठेवण्यात आली आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 4:12 AM