रायगडमधील पर्यटनस्थळे बहरली, धुळवड साजरी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:01 AM2021-03-30T01:01:20+5:302021-03-30T01:02:50+5:30
शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
अलिबाग - शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी जलक्रीडा, घोडागाडी, उंट सफारी, एटीव्ही सफारीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेही खबरदारीची पावले उचलली आहेत.
सलग आलेल्या सुट्ट्या आणि धुळवड साजरी करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे २६ मार्चपासून जिल्ह्यात हजारो पर्यटक मजा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यांतून पर्यटक जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, वरसोली, रेवदंडा, काशीद, मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्रकिनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत.
समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्र स्नानासह सुविधा उपलब्ध आहेत. जलक्रीडामध्ये बोटिंग, बनाना, जेट्सकी राइडचा आनंद पर्यटक लुटत आहेत. जलक्रीडा व्यावसायिक हे पर्यटकांना पॅकेज देत असून सुरक्षित आणि काळजी घेऊन राइड करीत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही आर्थिक लाभ होत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके तैनात केले आहेत. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.
हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल
२६ मार्चपासून हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक आनंदित आहेत. हॉटेल, रिसॉर्टही हाउसफुल्ल झाले आहेत. कोरोनानंतर साधारण एक महिन्यानंतर हॉटेल, व्यावसायिक यांना पर्यटकांमुळे आर्थिक फायदा होत आहे. येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच पुढे सोडले जात आहे.