रायगडमधील जलदुर्गांना पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:31 AM2019-12-25T01:31:28+5:302019-12-25T01:32:53+5:30

वर्षअखेरीस गर्दी वाढणार : पर्यटनासह ऐतिहासिक माहिती संकलनास प्राधान्य : सुविधा वाढविण्याची मागणी

Tourist preference for waterways in Raigad | रायगडमधील जलदुर्गांना पर्यटकांची पसंती

रायगडमधील जलदुर्गांना पर्यटकांची पसंती

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांकडून रायगड जिल्ह्यामधील जलदुर्गांनाही सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. जंजिरा, कुलाब्यासह खांदेरी, कोर्लई, पद्मदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटनाबरोबर स्वराज्याच्या आरमाराचे सामर्थ्य समजून घेतले जात असून वर्षअखेरीसही या किल्यांना भेटी देणाºया पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

गड, किल्ले ही महाराष्ट्राची संपत्ती. ही संपत्ती रायगड जिल्ह्यास भरभरून लाभली आहे. राज्यातील सर्वाधिक पर्यटक भेट देणाºया जिल्ह्यांमध्ये रायगडचा अग्रक्रम असून पर्यटक गड, किल्ल्यांना भेट देण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किनारपट्ट्यांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. समुद्रावरून इंग्रजांसह, सिद्दी व पोर्तुगिजांचे वर्चस्व कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात जलदुर्ग उभारले व पूर्वीचे जलदुर्ग ताब्यात घेण्यास प्राधान्य दिले. रायगड जिल्ह्यातील हे जलदुर्ग सद्यस्थितीमध्ये पर्यटनाचे सर्वात प्रमुख केंद्र बनू लागले आहेत. दूरदर्शनवरील छत्रपती संभाजी महाराज या मालिकेनंतर जंजिरा किल्ल्याविषयी आकर्षण वाढले असून, येथील पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक जंजिºयाला भेट देऊ लागले आहेत. मराठा आरमाराची राजधानी समजल्या जाणाºया कुलाबा किल्ल्यास भेट देण्यासही प्राधान्य दिले जात आहे. अलिबाग समुद्रकिनाºयावरून भरतीच्या वेळी बोटीने व ओहोटी असल्यावर चालत कुलाबा किल्ल्यावर जाता येते. कुलाब्यावर असणारे प्राचीन गणेश मंदिर, जुन्या तोफा, बांधकामाचे अवशेष इतिहासप्रेमींना आकर्षित करत आहेत. गडाविषयी माहिती देणारे फलकही येथे लावले असल्यामुळे मार्गदर्शकाशिवाय गड पाहता येतो.

खांदेरी हाही अलिबागजवळील सर्वात महत्त्वाचा जलदुर्ग. कोळी बांधवांचे देवस्थान असलेल्या वेताळदेवाचे मंदिर येथे असल्यामुळे मुंबई, नवी मुुंबई, ठाणे, पालघरमधील कोळी बांधव येथे दर्शनासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: या गडाचे बांधकाम करून घेतले. गडाचे बांधकाम सुरू असताना व नंतरही इंग्रजांसह सिद्दींनी हल्ले केले. मावळ्यांनी चिकाटीने इंग्रजांचा अनेक वेळा पराभव केला. समुद्रातील भरती, ओहोटीचे ज्ञान इंग्रजांपेक्षा स्थानिक कोळी बांधवांना जास्त असल्याचे या युद्धाच्या दरम्यान स्पष्ट झाले होते. यामुळे या किल्ल्यास भेट देण्यास इतिहासप्रेमी पसंती देऊ लागले आहेत. याशिवाय कोर्लई, पद्मदुर्ग, रेवदंडा, उंदेरी या जलदुर्गांनाही पर्यटक भेट देऊ लागले आहेत. वर्षअखेरीसही असणाºया सुट्ट्यांमध्येही हजारो पर्यटक जलदुर्गांना भेट देण्याची शक्यता आहे. कुलाबा व जंजिरा वगळल्यास इतर किल्ल्यांवर अत्यावश्यक सुविधा व माहिती फलकही पुरेसे नाहीत. या गडांवर योग्य सुविधा दिल्यास व गडांचा इतिहास सर्वांना समजेल अशी माहिती उपलब्ध केल्यास भविष्यात पर्यटकांची संख्या अजून वाढेल, अशी प्रतिक्रिया इतिहासप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.

गडांवर सुविधा हव्यात
च्रायगड जिल्ह्यांमधील जलदुर्गांना भेट देणाºया पर्यटकांची संख्या वाढत असली तरी पर्यटकांना आवश्यक सुविधा अनेक गडांवर नाहीत.
च्कुलाबा व जंजिरा वगळता इतर ठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधाही नाही. गडांचा इतिहास सांगणारे माहिती फलकही अनेक ठिकाणी उपलब्ध होत नाहीत.
च्योग्य सुविधा दिल्यास जलदुर्गांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

जंजिरा
जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील प्रमुख जलदुर्ग. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेला हा किल्ला पाहण्यासाठी इतिहासप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. दूरदर्शनवरील छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमध्ये कोंडाजी फर्जंद यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून जंजिºयाविषयी पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुलाबा किल्ला
अलिबाग समुद्रामध्ये असलेला कुलाबा किल्ला म्हणजे मराठा आरमाराची राजधानी. गडावरील प्राचीन मंदिर, जुनी बांधकामे, तोफा, पुरातन वास्तूंचे अवशेष यामुळे गडाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. ओहोटीच्या वेळी चालत गडावर जाता येते. गडाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात आल्यामुळे मार्गदर्शकाशिवाय गडाचा इतिहास समजून घेता येतो.

कोर्लई किल्ला
पुरातत्त्व विभागाने कोर्लई किल्याचाही संरक्षित स्मारकांमध्ये समावेश केला आहे. गडावर कुंडलिका खाडीचा निसर्गरम्य परिसर पाहता येतो. गडावर ठिकठिकाणी पुरातन तोफा, पुरातन चर्च आहे. गडाच्या माथ्यावर असणारा बंदिस्त तलाव हाही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

द्रोणागिरी किल्ला
उरण शहराला लागून द्रोणागिरी किल्ला आहे. सातवाहन कालामध्येही या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. सन १५३०पासून पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला व त्यांच्याकडून १७३९मध्ये मानाजी आंग्रे यांनी जिंकून स्वराज्यात आणला. गडावर जुन्या बांधकामाचे अवशेष अजूनही पाहावयास मिळत असून उरणचा समुद्रकिनारा पाहावयास मिळतो.

पद्मदुर्ग ऊर्फ कासा
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. जंजिरा ताब्यात न आल्यामुळे त्याच्याजवळच पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. इतिहासप्रेमी नागरिक या गडाला भेट देत असतात. मुख्य किल्ला व त्यासमोरील पडकोट असे गडाचे दोन भाग असून, पडकोट नामशेष होण्याच्या मर्गावर असला तरी मुख्य किल्ल्याची तटबंदी अजून भक्कम आहे.

Web Title: Tourist preference for waterways in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.