जयंत धुळप अलिबाग : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरु सलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून नवगावला भेट दिली आणि भारतातील पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करून, भारत-इस्रायल मैत्रीचा गोडवा वृद्धिंगत केला आहे.रविवारी इस्रायलमधील तब्बल २०० ज्यू नागरिकांनी नवगावला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता, अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी दिली.ज्यू बांधवांनी नवगाव येथे आ. जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना ‘जेरुसलेम गेट’ या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नवगावातील ‘जेरु सलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असे आश्वासन दिले. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगूळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला.रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे, तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसित केल्यास भारत आणि इस्रायलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.‘जेरु सलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीकज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणे एकरूप झाला. आजच्या घडीला जगभर दहशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीक होईल, अशी भावना इस्रायलमधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.पन्नास वर्षांनंतरही आश्रयस्थळाशी नाते कायमज्यू बांधव नवगाव येथून इस्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे, तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेक जण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.
‘जेरु सलेम गेट’ होणार पर्यटन स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:26 AM