जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजली
By Admin | Published: December 31, 2016 04:27 AM2016-12-31T04:27:17+5:302016-12-31T04:27:17+5:30
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टारंट गेल्या आठवड्यापासूनच
अलिबाग : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टारंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजून गेली आहेत. सुमारे दहा लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज असल्याने नववर्षाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढल अपेक्षित आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनारच्या हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग यांना पसंती दिल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, माथेरान अशा विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर शुक्रवारपासूनच पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंटच्या व्यवस्थापनाने डीजे नाईट पार्टीचे आयोजन केले आहे. सुमारे एक हजार रुपयांपासून ते थेट १० रुपयांपर्यंतचे पॅकेजच त्यांनी पर्यटकांना देऊ केले आहे. त्यामध्ये खाणे-पिणे, नाच-गाणी यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने काही रेस्टारंट यांना तात्पुरत्या स्वरूपात परवाने दिले आहेत. बनावट मद्य विक्री करणाऱ्यांवरही त्यांनी नजर ठेवली आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या कॉटेजमध्येही पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ, आॅर्केस्ट्रा यांची व्यवस्था केली आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कोकणी, गोमांतक, आगरी, कोळी अशा मांसाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. पर्यटकांना विविध बाइक, एटीव्ही राईड, घोडे, उंट सवारी यांचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी त्या-त्या व्यावसायिकांनीही जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात सुमारे दहा लाख पर्यटक दाखल झाल्याने विविध माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल वीकेण्डला होणे अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेला बाजार पुन्हा गजबजणार असल्याचे अधोरेखित होते. (प्रतिनिधी)
विशेष पोलीस
पथक स्थापन
नववर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आबालवृध्द सरसावले असून पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. शहरातील फार्म हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट, धाब्यांवर यादिवशीचे बुकिंग फुल्ल झाल्याचे पहायला मिळते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यात बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, रिसॉर्ट्सबरोबरच खासगी फार्महाऊसची संख्या मोठी आहे. नोटाबंदीमुळे नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरी नववर्षाच्या स्वागतावर याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.