मुरुड जंजिरा : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मुरुडमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मुरुडसह काशीद नांदगाव, सर्वे आदींसह सर्व भागात पर्यटक पसरले आहेत. पर्यटनाच्या अनेक ठिकाणी ३ जानेवारीपर्यंत बुकिंग झाले आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी अडचणी येणार आहेत.
नाताळच्या सुट्टीनंतर आता नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक गुरुवारपासूनच मुरुड व काशीदमध्ये दाखल झाले आहे. राजपुरी येथे वसलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी होते. नाशिक, औरंगाबाद, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, मुंबई, ठाणे आदी भागांतील पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा हा प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. काशीद येथे पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र आहे.
व्यवसाय तेजीत काशीद येथे सुद्धा पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉटेल सी ब्रीझ, मरिना लॉज, गोल्डन स्वान हॉटेल आदीसह अन्य हॉटेल व्यावसायिक यांची भेट घेतली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व रूम बुक असल्याचे सांगितले आहे. काही हॉटेलमध्ये ३ जानेवारीपर्यंत बुकिंग असल्याने हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक तेजीत आला असून पर्यटक वाढण्याची शक्यता आहे.
तपासणीत दंड वसुलीपर्यटकांनी कोरोनाविषयी नियम पाळणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. ३० ते १ जानेवारीपर्यंत कसून तपासणी करण्यात येणार असून या तपासणीत मोठी दंड वसुली करण्यात येणार आहे. कोरोना नियमावलीचे पालन केल्यास पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही. गर्दी मोठ्या प्रमाणात टाळण्यासाठी व नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
चेक पोस्टवर सक्तीची तपासणीओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्ट सक्तीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पर्यटकांचे दोन डोस पूर्ण आहेत का? प्रत्येकाने मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मुरुड तालुकयातील साळाव चेक पोस्ट वर ट्राफिक पोलीस यांच्यासह स्थानिक पोलीससुद्धा सतर्क झाले आहे. वाहनांची तपासणी मोहीम जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.