मुरुड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल; पावसाळी वातावरणातही पर्यटक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:18 PM2020-10-11T23:18:37+5:302020-10-11T23:18:52+5:30
घोडेस्वारी, त्याचप्रमाणे समुद्र स्नान करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत होते. स्थानिक घोडेस्वार व वाळूवर चालणाऱ्या गाड्या धावत होत्या,
मुरुड : तालुक्यात शनिवारपासून पावसाळी वातावरण असतानाही पर्यटकांनी येथे येणे पसंद केले आहे. मुंबईपासून १६५ किलोमीटर अंतरावर मुरुड असल्याने ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील पर्यटक मुरुडला सर्वाधिक पसंती देत असतात. विशाल असा समुद्रकिनारा व ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकडे पर्यटकांचा कल सर्वाधिक असतो. शनिवार, रविवार पाऊस असतानाही पर्यटकांनी मुरुडमध्ये गर्दी केली होती.
घोडेस्वारी, त्याचप्रमाणे समुद्र स्नान करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत होते. स्थानिक घोडेस्वार व वाळूवर चालणाऱ्या गाड्या धावत होत्या, तसेच स्थानिकांच्या चहा टपरी व अल्पोहार यावर गर्दी दिसून येत होती, तर काही पर्यटकांनी राजपुरी जेट्टी व खोरा बंदर या ठिकाणी जाऊन जंजिरा किल्ला लांबून पहाण्याचा आनंद घेतला. सध्या जंजिरा किल्ला पर्यटकांना खुल्ला करण्यात आलेला नाही. त्यामुळे असंख्य पर्यटक हा किल्ला दुरून पाहताना दिसत आहेत.
जंजिरा किल्ल्यावर मार्च महिन्यापासून शिडाच्या बोटी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, तसेच किल्लाही बंद ठेवण्यात आल्याने स्थानिकांचा स्वयंरोजगार बंद पडला असून, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. जंजिरा किल्ल्यावर स्थानिक बोट मालक शहाळी विक्रेते, सरबत विक्रेते, टोपी व गॉगल विक्रेत्याचे धंदे कायमस्वरूपी बंद पडल्याने, या ठिकाणी रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रोजगार पुन्हा प्राप्त व्हावा, यासाठी शासनाने लवकरात लवकर जंजिरा किल्ला सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.