अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले
By राजेश भोस्तेकर | Published: January 1, 2024 06:32 PM2024-01-01T18:32:27+5:302024-01-01T18:32:56+5:30
पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.
अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२४ नव वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवारी दाखल झाले होते. नववर्षाचे स्वागत करून पर्यटक हे सोमवारी १ जानेवारी २०२४ ला माघारी फिरले. मात्र जाताना पर्यटकांचे मोठे हाल पाहायला मिळाले. अलिबाग एस टी आगारात बसला तुफान गर्दी पर्यटक प्रवाशाची झाली होती. अलिबाग आगारात येणाऱ्या अनेक बसेस ह्या वाहतूक कोंडीत अडकल्याने पर्यटकांना बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागले होते. पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.
नववर्ष स्वागतसाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली होती. त्यामुळे शनिवार पासून अलिबागमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरू झाली होती. अनेक पर्यटक हे जलवाहतूक तसेच एस टी बसचा प्रवास करून अलिबागेत दाखल झाले होते. रविवारी सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागत आलेल्या पर्यटकांनी जल्लोषात केले होते. अलिबागचे समुद्रकिनारे हे पर्यटकांनी बहरून गेले होते. ३१ डिसेंबर रोजी रात्री पार्टी करून पर्यटक मद होष झाले होते.
सोमवारी १ जानेवारी २०२४ रोजी पर्यटक हे पुन्हा मुंबई, ठाणे कडे माघारी जाण्यास निघाले. बसने आलेले पर्यटक हे अलिबाग आगारात दाखल झाले. मुंबईकडे जाणारी परतीची बस पकडण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी सायंकाळच्या सुमारास आगारात झाली होती. वीना वाहक पनवेल बसला आगारात तुफान गर्दी झाली होती. तर इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरही पर्यटक बसची वाट पाहत होते. अलिबाग आगारातून नववर्षाच्या अनुषंगाने नियोजन केलेले असले तरी त्याचा फज्जा उडाला होता. बाहेरून आगारात येणाऱ्या बसेस ही वाहतूक कोंडीत अडकले असल्याने ती एक अडचण निर्माण झाली होती. अलिबाग आगारात सायंकाळच्या सुमारास हजारो पर्यटक प्रवासी हे बसची वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जलवाहतूकिवरही प्रवाशांची गर्दी
मांडवा येथून जलवाहतूककीने गेटवेला जाण्यासाठी प्रवशांची गर्दी झाली होती. दुपारी नंतर ही गर्दी वाढल्याने जलवाहतूकिवर परिणाम दिसला. जलवाहतूक बोटी व्यवसायिकही प्रवाशांची गैरसोय सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र प्रवासी संख्या अधिक असल्याने त्याचेही वेळापत्रक कोलमडले होते.